मार्च महिन्यातच कल्याण डोंबिवली शहराचे तापमान ४१ डिग्रीवर | पुढारी

मार्च महिन्यातच कल्याण डोंबिवली शहराचे तापमान ४१ डिग्रीवर

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. मार्च मध्येच इतकं तापमान असल्याने उकड्याचे पुढील तीन महिने कसे जणार असा प्रश्न कल्याण डोंबिवलीकरांना पडला आहे. विशेष म्हणजे ठाण्याचे तापमान ३५ अंश सेल्सिअस असताना डोंबिवलीचे तापमान इतके वाढण्याचे कारण वृक्षतोड असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करत आहेत.

गेल्या दोन दिवसापासून कल्याण – डोंबिवलीत आगीचे सत्र सुरू झाले असून शनिवारी रात्री डोंबिवलीचा श्वास असणाऱ्या उंबर्ली टेकडीला आग लागली. तर रविवारी रात्री बंदिश पॅलेस जवळील एका गोदामाला आग लागली. मुळातच कल्याण डोंबिवलीचा तापमानाचा पारा वाढल्याने आग लागत असल्याचे बोलले जात आहे. मात्र उंबार्ली येथील डोंगराला आग लागल्याने या डोंगरावर असणारी शेकडो झाडे देखील आगीत होरपळली गेली. कल्याण डोंबिवली शहरात झाडं कमी असून सगळीकडे इमारतीचे जाळे पसरले आहे. त्यामुळे पारा वाढण्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रीन कव्हर कमी होत आहे. इतकेच नव्हे तर ओझोनची पातळी देखील खालावत असल्याने सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडत आहेत. त्यामुळे तापमानाचा पारा सगळीकडेच वाढलेला दिसतो. मात्र कल्याण डोंबिवलीत वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच कारखान्याचे प्रदूषण, इमारती बांधकामांचे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रदूषणाची बरोबरच मोठ्या झाडांची संख्या अत्यल्प आहे. या सर्व कारणांमुळे तापमानात वाढ होत आहे.
– रुपाली शाईवाले, पर्यावरण तज्ज्ञ

 

Back to top button