chitra ramkrishna : कथित 'योगी' च्या इशाऱ्यावरून शेअर बाजाराचे कामकाज; चित्रा रामकृष्ण यांना १४ दिवसांची कोठडी | पुढारी

chitra ramkrishna : कथित 'योगी' च्या इशाऱ्यावरून शेअर बाजाराचे कामकाज; चित्रा रामकृष्ण यांना १४ दिवसांची कोठडी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (chitra ramkrishna) यांना स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एका कथित ‘योगी’ च्या इशाऱ्यावरून शेअर बाजाराचे कामकाज चालविल्याचा आरोप चित्रा रामकृष्ण यांच्यावर आहे.

एनएसई को-लोकेशन प्रकरणातही त्यांच्यावर आरोप आहेत. पुढील सुनावणीवेळी म्हणजे 28 मार्च रोजी स्वतः न्यायालयात हजर रहावे, असे निर्देश न्यायमूर्ती संजीव अग्रवाल यांनी चित्रा रामकृष्ण (chitra ramkrishna) यांना दिले. चौकशीदरम्यान चित्रा रामकृष्ण दिशाभूल करणारी उत्तरे देत असून सहकार्य करीत नसल्याच्या युक्तिवाद सीबीआयकडून करण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली. चित्रा यांना घरचे जेवण देण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली, मात्र न्यायालयाने त्यास नकार दिला.

हिमालयातील कथित योगीच्या सल्ल्याने एनएसईचे निर्णय घेण्यासह गोपनिय माहिती लीक केल्याचा ठपका रामकृष्ण यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सीबीआयने याप्रकरणाशी संबंधित मुंबईतील सेबीच्या कार्यालयातील महत्वपूर्ण दस्तावेज आणि डीजिटल पुरावेदेखील हस्तगत केले आहेत. दरम्यान, याआधी दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात रामकृष्ण यांच्या बाबतच्या सीबीआयच्या तपासावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले होते. एनएसई को – लोकेशन गैरव्यवहार प्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने सुरु असल्याबाबत न्यायालयाने या प्रकरणात सीबीआय आणि सेबीला सुनावले होते.

Back to top button