ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे-दिवा या ६२० कोटी खर्चाच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण झाल्याने मुंबईची (Thane-Diva Railway Line) ही वाहतुकवाहिनी अधिक गतिमान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे रूप घेऊन लोकसेवा करेल. त्याचबरोबर भारतीय रेल्वेही जनसेवेसाठी पुढे येईल असे अभिवचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्यात दिले. रेल्वेच्या आधुनिकीकरणामध्ये स्वदेशी कारखाने मोठे योगदान देत आहेत. आपल्या भारतीय तंत्रज्ञानातून आपली नवी रेल्वे उभी राहत आहे याचा आनंद मला आहे असेही पंतप्रधान म्हणाले.
ठाणे – दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिका प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते झाले. रेल्वे ही देशाची इकॉनॉमिक लाईफलाईन बनेल असे सांगताना, पंतप्रधानांनी रेल्वेच्या अत्याधुनिकरणाची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार निरंजय डावखरे आदी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधानांनी आजच्या प्रकल्पामुळे प्रामुख्याने चार फायदे होणार असल्याचे सांगितले. ठाणेवासीयांचे जीवन अधिक सुखकारक होण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी ठरेल. धीम्या गतीच्या रेल्वे तसेच जलद रेल्वे, मेल एक्सप्रेस यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील. त्यामुळे प्रवासात येणारे अडथळे दूर होतील. एका बाजूला भारतीय रेल्वेचे रूप बदलले जात असताना, दुसऱ्या बाजूला संपूर्ण देशात मेट्रोचे (Thane-Diva Railway Line) नेटवर्क अधिक गतिमान होत आहे. त्यामुळे शहरांमधील अंतर्गत प्रवास विनासायास होईल.
आज जो प्रकल्प पूर्ण झाला आहे त्याची मागणी २०१४ पासून, होत होती. मात्र ती आज पूर्ण झाली, याचा मला अभिमान आहे. असे सांगताना ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा शुभारंभ आज होत आहे याबद्दल मी मुंबईवासीयांना शुभेच्छा देतो. ही नवी रेल्वे मार्गिका मुंबईवासीयांच्या (Thane-Diva Railway Line) जीवनात नवा आमूलाग्र बदल घडवून आणेल. यामुळे येथील जीवनमान उंचावेल. मुंबईची कधीही न थांबणारी ही वाहिनी गतिमान रूप घेईल. मुंबईवासियांसाठी महत्वाचे चार फायदे यामुळे होणार आहेत. पहिला फायदा- एक्सप्रेस आणि लोकलला वेगवेगळ्या मार्गिका उपलब्ध होतील. दुसरा फायदा – इतर राज्यांतून येणाऱ्या रेल्वे पासिंगसाठी वाट पाहावी लागणार नाही. तिसरा फायदा- कल्याण ते कुर्ला या विभागात मेल एक्सप्रेस विना विलंब धावू शकतील. आणि चौथा फायदा – कळवा-मुंब्रा येथे दर रविवारी मेगा ब्लॉकमुळे होणारी प्रवाश्यांची गैरसोय दूर होईल.
आजपासून मध्य रेल्वेवर ३६ नव्या लोकल सुरु होतील. लोकल सेवेचा हा विस्तार आहे. आणि आधुनिकीकरणाचे नवे पाऊल आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची ही पूर्तता आहे. गेल्या सात वर्षात मुंबईत मेट्रोचा विस्तार आणि रेल्वेचे आधुनिकीकरण यावर आम्ही भर दिला आहे. मुंबईच्या सर्व भागांमध्ये दळणवणनाच्या आधुनिक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. अनेक दशके मुंबईची सेवा करणारी ही लोकल अधिक गतिमान करणे, हे आमचे कर्तव्य आम्ही समजतो. २००८ ला या कामाचे भूमिपूजन झाले. परंतु काम पुढे सरकले नाही. २०१४ नंतरच या कामला गती मिळाली असे सांगत पंतप्रधानांनी मनमोहन सिंग सरकारच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले. आज समस्यांचे निराकरण झाले आहे. अनेक आव्हानांचा सामना करत रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे काम पूर्ण केले आहे. रेल्वेच्या इंजिनिअर्सनी कर्तृत्व दाखवले. मुंबई शहराने भारताच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. म्हणूच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत मुंबईला (Thane-Diva Railway Line) आत्मनिर्भर बनविणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. मुंबईच्या अत्याधुनिक सुविधांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रेल्वे सुविधा वाढवणे हे आमचे कर्तव्य आहे.
लोकल रेल्वेचे विस्तारीकरण हा आमचा पुढचा महत्वाचा टप्पा आहे. ४०० किलोमीटर एवढा विस्तार आम्ही या रेल्वेचा करू. तसेच सर्व रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण आम्ही करणार आहोत. भारतभर मुंबईला रेल्वे कनेक्टिव्हीटीने जोडणे आवश्यक आहे. यासाठी अहमदाबाद-मुंबई हाय स्पीड रेल्वे, मुंबई-हैदराबाद हाय स्पीड रेल्वे असे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातून मुंबई अधिक सशक्त होईल. त्याचबरोबर भारतीय रेल्वेला सुरक्षित बनवणे ही आमची प्रथम प्राथमिकता आहे. कोरोना महामारीतही रेल्वेचे काम थांबले नाही. ८ हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आज पूर्ण झाले आहे. तसेच साडे चार हजार किलोमीटर रेल्वे मार्गांचा विस्तार झाला आहे. काही ठिकाणी दुहेरीकरण झाले आहे. गेल्या सात वर्षात रेल्वे उपक्रमांना प्रोत्साहित केले जात आहे. तसेच पायाभूत प्रकल्प उभे केले जात आहेत.
सुरुवातीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी रेल्वेच्या आधुनिकीकरणाची ग्वाही देताना आजच्या ठाणे-दिवा मार्गिकांच्या विस्तारामुळे साडे सात कोटी प्रवाश्यांना मोठा लाभ मिळणार आहे. रेल्वेसाठी पंतप्रधानांचे दूरदर्शी व्हिजन महत्वपूर्ण ठरत आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत भारतीय रेल्वे मोठे योगदान देणार आहे. नवीन भारत तयार करण्याच्या प्रक्रियेत भारतीय रेल्वेचे आणि रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होत आहे. प्रत्येक शहराची लाईफ लाईन आता रेल्वे होत आहे. नव्या आधुनिकीकरणातून नवभारताचे स्वप्न साकार होत आहे. यापुढे ३०० मिलियन डॉलरची नवी इंडस्ट्री निर्माण होत आहे. यामधून आधुनिक भारताचे स्वप्न साकार होईल. भविष्यात भारत रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे केंद्र बनेल आता विश्वासही वैष्णव यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांना रेल्वेच्या आधुनिकीकरणाबद्दल धन्यवाद दिले. कालच नवी मुंबईत वॉटर टॅक्सिचे उदघाटन झाले. आणि आज रेल्वेच्या विस्तारीकरणाचे होत आहे. खरंतर भारतातील पाहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सुरु झाली. तो काळ पारतंत्र्याच्या होता. सुरुवातीच्या रेल्वेमध्ये कोणी बसायलाही तयार नव्हते. इंग्रजांची ही एक साजिश असावी असा समज होता. मात्र हळू हळू या रेल्वेची सवय भारतीयांना झाली. रेल्वेचा हा प्रवास १०० वर्षे जुना आहे. अनेक अडचणींवर मात करून हा प्रकल्प आज पूर्ण झाला. यामुळे लाखो प्रवाश्यांची सोया होणार आहे. रेल्वे, मैत्री जलमार्ग यामुळे दळणवळणाच्या सुविधा गतिमान होतील या वाहिन्या भविष्यातील विकास वाहिन्या बनतील अशी ग्वाही मुख्यामान्यांनी दिली.
हेही वाचलत का ?