Sakibul Gani : बिहारचा साकिबुल गनी पदार्पणातच त्रिशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज! | पुढारी

Sakibul Gani : बिहारचा साकिबुल गनी पदार्पणातच त्रिशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारच्या साकिबुल गनी (Sakibul Gani) या २२ वर्षीय युवा फलंदाजाने इतिहास रचला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणात त्रिशतक झळकावणारा साकिबुल हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. मिझोरामविरुद्धच्या रणजी सामन्यात त्याने विक्रमी खेळी केली. त्याच्याआधी जागतिक क्रिकेटमध्ये इतर कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केलेली नाही.

387 चेंडूत त्रिशतक…

उजव्या हाताने फलंदाजी करणा-या साकिबुलने गनीने (Sakibul Gani) पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 387 चेंडूंमध्ये त्रिशतक पूर्ण केले. 84.20 च्या स्ट्राईक रेटने त्याने फलंदाजी करताना त्याने 405 चेंडूत 341 धावा केल्या. या ऐतिहासिक खेळीत त्याने 56 चौकार आणि 2 षटकारही फटकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा साकीबुल बिहारचा पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी 1967 मध्ये आनंद शुक्ला यांनी ओडिशाविरुद्ध नाबाद 242 धावांची खेळी केली होती.

गनीची विश्वविक्रमी खेळी…

साकिबुलच्या (Sakibul Gani) आधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणातच सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा विश्वविक्रम मध्य प्रदेशच्या अजय रोहरा याच्या नावावर होता. 2018-19 च्या रणजी मोसमात अजयने हैदराबादविरुद्ध 267 धावा केल्या होत्या, मात्र आता गनीने रोहरा याच्या खेळीला मागे टाकले आहे.

बाबुल कुमारसह 538 धावा जोडल्या…

एकवेळ अशी होती की, बिहारची धावसंख्या 3 बाद 71 होती. त्यानंतर जे झाले ते क्रिकेट इतिहासाच्या पानात कायमचे नोंदले गेले. बाबुल कुमार आणि साकिबुल गनी (Sakibul Gani) यांनी चौथ्या विकेटसाठी 756 चेंडूत 538 धावांची भागीदारी केली. रणजीतील चौथ्या विकेटसाठी ही चौथी सर्वोच्च भागीदारी ठरली. साकिबुलच्या त्रिशतकाशिवाय बाबुल कुमारनेही द्विशतक झळकावले.

Back to top button