डोंबिवली : कलाकारांनी जागवल्या लता दीदींच्या आठवणी | पुढारी

डोंबिवली : कलाकारांनी जागवल्या लता दीदींच्या आठवणी

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा :  स्वर देवता लता मंगेशकर यांची स्वर यात्रा वयाच्या ९३ व्या वर्षी विसावली. डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. याच नगरीत राहणाऱ्या अनेक कलाकारांनी लता दिदी यांच्या सोबत काम केले आहे. यापैकी राजू कुलकर्णी, विनायक कुलकर्णी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार मनोज मेहता यांनी लता दिदींसोबतच्या आठवणीला उजाळा दिला.

यावेळी विनायक कुलकर्णी यांनी सांगितले की, मी त्यावेळी मोहन वाघ यांच्यासोबत रंगमंच साजवटीचे काम शिकत होतो. असेच एकदा काम करत असताना पाहाणी करण्यासाठी लतादीदी अचानक मागे येऊन बसल्या. त्यांनतर त्यांनी मी करत असलेल्या कामाची पद्धत पहिली आणि दखल घेत मला शाबासकीची थाप दिली. त्यानंतर पुढे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात रंगमंच सजवायचे काम त्यांनी मला दिले. यावेळी विनायक कुलकर्णी यांनी संगीताच्या चीन्हामधून कलात्मकरित्या त्यांना श्रद्धांजली देत एक सूर निखळला असे भाव व्यक्त केले.

छाया चित्रकार मनोज मेहता यांनी काढलेले लता दिदींचे फोटो दाखवायला त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी दिलेला आदर मी कधीही विसरू शकणार नाही असे सांगितले. ध्वनी संयोजक असणाऱ्या राजू कुलकर्णी यांनी सहाय्यक ध्वनी संयोजक म्हणून लता दिदींबरोबर काम केले असल्याचे सांगत अनेक आठवणी जागवल्या. यावेळी डोंबिवलीत दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब या संस्थेतर्फे एक कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमात लता दिदी स्वतः उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी माझा सत्कार केला होता. इतकेच नव्हे तर एका कार्यक्रमात त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. मला कायमच त्यांनी प्रोत्साहन दिले असे सांगितले. त्यामुळे डोंबिवलीतील कलाकारांबरोबर त्यांचे नाते देखील घट्ट होते.

हे ही वाचलं का  

Back to top button