ठाणे जिल्ह्यात १३ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल  | पुढारी

ठाणे जिल्ह्यात १३ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल 

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे मुरबाड तालुक्यात चार आदिवासी रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यानंतर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बोगस डॉक्टरांवर आळा बसावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांच्या नावांची यादी दर्शनी भागात लावावी. प्रत्येक ग्रामसभेत अधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची नावांचे वाचन करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने आज येथे दिल्या. त्यावेळी  ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ११, मुरबाड आणि कल्याणात प्रत्येकी एक अशा एकूण १३ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकारी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, पोलीस उपअधीक्षक मुणगेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलिस, तालुका आरोग्य अधिकारी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

मुरबाड तालुक्यात झालेल्या बोगस डॉक्टरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत बोगस डॉक्टर शोध मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेने तालुक्यातील अन्य यंत्रणेशी समन्वय करून प्रभावीपणे ही मोहिम राबविण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांनी दिल्या. ग्रामीण भागात विशेषता आदिवासी वस्ती, पाड्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृतीवर भर द्यावा स्थानिक बोलीभाषेत त्यांना ही माहिती द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गावात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये गावात अधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची यादीचे वाचन करावे जेणेकरून ग्रामस्थांना त्याची माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात फलकावर गावातील अधिकृत वैद्यकीय व्यवसायांची नावे लिहावीत. त्यामुळे ग्रामस्थांना योग्य माहिती मिळेल. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गावातील, तालुक्यातील अन्य विभागाच्या समन्वयातून ही कारवाई करण्याचे ठोंबरे यांनी सांगितले. दरमहा तालुका यंत्रणेची आढावा घ्यावी आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात सर्वाधिक ११ बोगस डॉक्टरांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून कल्याण आणि मुरबाड तालुक्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत एकूण १३ बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button