

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांची बँक व राजवाडा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कहर करत ऐन पेरणीच्या काळात वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. काळ्या आईची ओटी भरून पिके सांभाळण्याच्या धांदलीत असलेले शेतकरी यामुळे हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न बनवण्याच्या हेतूने जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली. या बँका कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबरोबरच कृषी पूरक उद्योग, व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या हेतूने कार्यरत राहिल्या. मात्र अलीकडच्या काळात मूळ ध्येय विसरून या बँकांनी सहकारी साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा केला. अर्थपुरवठा केलेल्या कारखान्यांकडून वेळेत कर्जाची भरपाई झाली नाही. यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आली. संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत या बँकेने शेतकऱ्यांना वसुलीसाठी तगादा लावला.
दरम्यान दोनवेळा कर्जमाफी योजना जाहीर झाली. यात अल्पभूधारक शेतकरी व पूर्वीच्या योजनेत सहभाग नसलेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफी मिळाली. यात बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्या शेतकऱ्याकडून वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात तगादा लावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांसमोर अंधार पसरला आहे. गेल्या वर्षीही खरीप, रब्बी हंगामाच्या पेरणीच्या कालावधीत नोटीसा पाठवून व वसुली पथक शेतात आणि घरासमोर पाठवून तगादा लावण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांची मानहानी तर झालीच. शिवाय पेरणीसाठी ठेवलेले पैसे बँकेला भरून रान मोकळे ठेवावे लागले. हुकूमशहाप्रमाणे बँका वसुलीसाठी प्रयत्न करत असल्याने शेतकरी यंदाही अडचणीत सापडला आहे.
एकच गट, एकच उतारा, एकाच संयुक्त उताऱ्यावर असलेल्या एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या नावावरील कर्जमाफी झाली तर दुसऱ्या दोन व्यक्तींची कर्जमाफी झाली नाही, हे कशामुळे झाले याबाबत सचिवांकडे विचारणा केली असता ते हात वर करत आहेत. कर्जमाफीचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना आता नोटिसा पाठवून त्यांचा अंत पाहण्याचा प्रयत्न केला आहे, यावरून बँक प्रशासनाबाबत संताप आणि शंकाही उपस्थित होत आहे.
शेतीच्या वाटणीवेळी काही जण घरातील अज्ञान बालकांच्या नावावर शेती करतात आणि त्याला अज्ञान पालक बालक म्हणून घरातील जेष्ठ माणसं असतात. याची नोंद बँकांकडे असते. शिवाय कागदोपत्री असा उल्लेख असतो. तरीही जिल्हा बँकेकडून अज्ञान बालकाच्या नावावर नोटीस पाठवून एक प्रकारे त्या बालकासह कुटुंबीयांना मनस्ताप देण्याचा सपाटा चपळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सचिव आणि बँक निरीक्षकाने लावला आहे.
साखर कारखानदारांना सोडून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास देण्याचा सपाटा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरू केला आहे. अज्ञान बालकांना नोटीस पाठवण्याची बाब गंभीर आहे. याबाबत बँकेच्या प्रशासनाने फेरविचार करावा; अन्यथा बँकेला टाळे ठोकण्यात येईल.
– सागर तेली, माजी पंचायत समिती सदस्य, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर
हेही वाचा