उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा: जगभरात कौशल्याला फार महत्त्व आहे. अनेक राष्ट्रे त्यामुळेच प्रगत झाली आहेत. तरुणांना करिअर घडविण्यासाठी जगभरात अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्यासाठी ध्येय निश्चित ठेवणे आवश्यक असल्याचे मत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या शैक्षणिक संकुलाचा पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार शैक्षणिक संकुल असा नामकरण सोहळा झाला. या वेळी जयंत पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक संस्थेच्या स्वागत कमानीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे होते. आमदार अशोक पवार, संस्थेचे सचिव सोपान कांचन, विश्वस्त महादेव कांचन, संभाजी कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, ग्रामपंचायत सदस्य अमितबाबा कांचन या वेळी
उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, की विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या उपलब्ध संधीतून जगभरात आपला नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करावा. सोपान कांचन यांनी संस्थेच्या शिक्षक मान्यतेची मागणी शासनापुढे मांडण्याची मागणी जयंत पाटील यांच्याकडे केली.