स्मार्ट सिटीअंतर्गत असलेली कामे विहित कालमर्यादेत व गतीने पूर्ण करावीत : राधाकृष्ण विखे पाटील

स्मार्ट सिटीअंतर्गत असलेली कामे विहित कालमर्यादेत व गतीने पूर्ण करावीत : राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे विहित कालमर्यादेत व गतीने पूर्ण करावीत. तसेच पायाभूत सुविधा, विकास कामे दर्जेदार होतील, यावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या.

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांच्या नियोजन भवन सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. स्मार्ट सिटी अंतर्गत अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. नव्याने करण्यात येणाऱ्या कामांसाठी नियमावली तयार करावी. सोलापूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच नागरिकांना समप्रमाणात व समान दाबाने पाण्याचा पुरवठा होण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना तात्काळ मार्गी लावावी.

सांडपाण्यातून पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्यानासह इतर आवश्यक ठिकाणी करावा. तसेच जल शुद्धीकरण केंद्रावरती सोलर यंत्रणा बसवावी, जेणेकरून खर्चात बचत होईल. सार्वजनिक नळ जोडण्याबाबत महानगरपालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत सोलापूर स्मार्ट सिटीसाठी एकूण 753.48 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून विकास कामांसाठी 700.55 कोटी निधी खर्च करण्यात आलेला आहे.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत ओपन जिम, ई टॉयलेट, घंटागाडी खरेदी, पाणीपुरवठा यंत्रणा सुधारणा, होम मैदान नूतनीकरण, उद्यान सुशोभीकरण, इंदिरा गांधी स्टेडियम, रंगभवन चौक पब्लिक प्लाझाची निर्मिती, ट्रान्सफर स्टेशन, सिद्धेश्वर तलावाचा विकास, महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, स्ट्रीट लाईट, इंद्र भवन इमारत, रूफ टॉप सोलर पॅनल आदि कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिली.

तसेच, सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उजनी जलाशय ते सोलापूर समांतर जलवाहिनी वाढीव पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही केली जाईल. असेही आयुक्त तेली उगले यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांची सद्यःस्थिती व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती त्यांनी दिली.

-हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news