Who Is Prabhakar Kore : डॉ. प्रभाकर कोरे यांच्या शैक्षणिक अन् आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव

भारताचा सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला 'पद्मश्री' पुरस्कार डॉ. प्रभाकर कोरे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
Dr Prabhakar Kore
Dr Prabhakar Kore
Published on
Updated on

संतोषकुमार कामत, अंकली

साहित्य, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल केएलई संस्थेचे मानद कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला 'पद्मश्री' पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ डॉ. कोरे यांचा नसून केएलई संस्था, वीरशैव-लिंगायत समाज आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वसामान्य समाजासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे. डॉ. कोरे यांचा वाढदिवस शनिवार, दि. ७ रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्यविषयी थोडक्यात...

पद्मश्री पुरस्कार हा सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोहोचविण्याच्या त्यांच्या आजीवन समर्पणाचा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेप्रति असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचा राष्ट्रीय गौरव आहे. गेल्या ४ दशकंहून अधिक काळ डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलई संस्थेचे नेतृत्व करत तिला जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थेमध्ये रूपांतरित केले आहे. 'शिक्षणापासून आरोग्यसेवेपर्यंत' या दूरदृष्टीच्या संकल्पनेला त्यांनी प्रत्यक्ष आकार दिला.

Dr Prabhakar Kore
Dr. Prabhakar Kore: डॉ. कोरे शरण साहित्‍य पुरस्‍काराने सन्‍मानित

सन १९८४ पासून २०२६ पर्यंत कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करताना केएलईच्या संलग्न संस्थांची संख्या ३८ वरून तब्बल ३१७ पर्यंत वाढविण्याचे श्रेय त्यांना जाते. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई शाळा, कन्नड माध्यमाच्या शाळा, तांत्रिक संस्था तसेच शिक्षणाच्या विविध संस्था स्थापन करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले. त्यांच्या दूरदृष्टीतून केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (KAHER), बेळगाव आणि केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी- हुबळी यासारख्या संस्थांची स्थापना झाली.

कृषी शिक्षणाला त्यांनी प्राधान्य देत कृषी शाळा, कृषी विज्ञान महाविद्यालय आणि संशोधन केंद्र सुरू केली. त्यामुळे ग्रामीण युवकांना आधुनिक शेतीचे शिक्षण व संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. संशोधन क्षेत्रात जागतिक आरोग्य संघटना (WHO), बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन, यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य प्रस्थापित करून केएलईला जागतिक संशोधनाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले.

Dr Prabhakar Kore
Dr. Prabhakar Kore: डॉ. कोरे शरण साहित्‍य पुरस्‍काराने सन्‍मानित

युएसएम-केएलई इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजच्या स्थापनेमुळे मलेशियासह विविध देशातील विद्यार्थी बेळगावमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. आरोग्यसेवेमध्येही डॉ. कोरे यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये २,४०० बेडचे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले. अवयव प्रत्यारोपणासह विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध आहेत. केएलई डॉ. संपतकुमार एस. शिवण्गी कर्करोग रुग्णालयाच्या माध्यमातून कर्करोगग्रस्तांना परवडणाऱ्या दरात आधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

केएलई प्रसारण विभाग, सामुदायिक रेडिओ केंद्र, अत्याधुनिक केएलई शताब्दी स्मारक सभागृह आणि कन्नड भवन यांच्या उभारणीमुळे बेळगावच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. गेली ४३ वर्षे डॉ. प्रभाकर कोरे यांनी शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा या क्षेत्रात सातत्याने कार्य केले आहे. केएलईच्या सुमारे ५० टक्के संस्था ग्रामीण भागात कार्यरत असून, ग्रामीण समाजाला गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यामागे त्यांची दूरदृष्टी आणि कार्यरतपरता महत्त्वाची ठरली आहे. कर्नाटकाच्या शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्राच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय मानले जाते.

Dr Prabhakar Kore
Padma Shri award 2026 | पद्मश्री पुरस्काराने डॉ. प्रभाकर कोरे सन्मानित

"पद्मश्री' हा केवळ माझा सन्मान नाही, तो संपूर्ण केएलई परिवाराचा गौरव आहे. संस्थेच्या प्रगतीत प्रत्येक कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांचे योगदान आहे. देवाine दिलेल्या संधीचा उपयोग करून मी समाजसेवा केली. ही संस्था केवळ माझ्यामुळे नसून सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे या उंचीवर पोहोचली आहे.

— पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, मानद कार्यकारी अध्यक्ष, केएलई संस्था

प्रमुख सन्मान

  • कर्नाटक राजोत्सव पुरस्कार (२००६)

  • कर्नाटक विद्यापीठाची मानद डी.लिट. पदवी (२००८)

  • राणी चन्नम्मा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट (२०१३)

  • युनिव्हर्सिटी सायन्स मलेशिया यांची मानद डॉक्टरेट (२०१५)

  • जेफरसन विद्यापीठ, फिलाडेल्फिया (अमेरिका) यांची मानद डॉक्टरेट (२०२२)

  • अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, दुबई आणि बहरीन येथील विविध जीवनगौरव पुरस्कार

  • पद्मश्री पुरस्कार (२०२६)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news