

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा- स्थळ जिल्हा न्यायालय परिसर… वेळ शनिवारी सकाळी साडेनऊची वेळ…. परिसरात प्रमुख जिल्हा न्यायाधीशांची गाडी प्रवेश करते.त्यांच्या नजरेस एक जखमी पक्षी पडतो. ते तत्काळ चालकाला गाडी थांबवायला सांगतात. स्वतः जखमी पक्ष्याला ताब्यात घेतात. त्याला पाणी पाजतात. तसेच पुढील उपचारासाठी प्रयत्नही करतात. या घटनेमुळे सोलापूरचे जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर अहेमद औटी यांचे पक्ष्यांवरील प्रेम न्यायालय परिसराने अनुभवले.
आज सकाळी साडेनऊच्या सुमारास न्यायालय परिसरात येताच जिल्हा न्यायाधीश डॉ. औटी यांच्या नजरेला एक जखमी अवस्थेत तडफडत असलेला पक्षी पडला. क्षणाचा विचार न करता औटी यांनी त्या पक्षाला ताब्यात घेतले. स्वतःच्या निजी कक्षामध्ये गेल्यानंतर स्वतःच्या हाताने त्या पक्ष्याला त्यांनी पाणी पाजले. त्याला झालेल्या जखमेचा अंदाज घेतला. पक्षी मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी स्वतः संपर्क साधला. 'ॲनिमल राहत'चे अजित मोटे हे न्यायालय परिसरात दाखल झाले. मोटे यांच्याशी चर्चा करून प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी त्या पक्ष्याला उपचारासाठी त्यांच्याकडे सुपूर्द केले. न्यायाधीश डॉ. शब्बीर अहेमद औटी यांच्या पक्षीप्रेम, वन्यजीव प्रेमावर चर्चा न्यायालय परिसरात दिवसभर हाेत हाेती.
जिल्हा प्रमुख न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी जखमी पक्षाला जीवदान दिले. त्यांची ही कृती प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.
– अजित मोटे, ॲनिमल राहत, सोलापूर
हेही वाचा :