Pandharpur Vitthal Temple Closed | भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीन दिवस राहणार बंद

श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे संवर्धन करण्यात येणार
 Vitthal Rukmini Idol Conservation
Vitthal Rukmini TemplePudhari
Published on
Updated on

Vitthal Rukmini Idol Conservation

सुरेश गायकवाड

पंढरपूर : श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण , राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली व सल्ल्याने तसेच उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशानुसार श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांचे मार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे दि. 23 ते 25 सप्टेंबर तीन दिवस विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या समवेत मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

दि.11 जून रोजी एस कार्तिकेयन, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध तज्ज्ञ, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समितीचे पदाधिकारी, सल्लागार परिषद सदस्य आणि संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. प्राप्त तांत्रिक मार्गदर्शन आणि शिफारशींच्या आधारे दि. 22 ते 24 जून या कालावधीत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 Vitthal Rukmini Idol Conservation
Solapur IT Park : होटगी येथील आयटी पार्कच्या जागेचा प्रस्ताव सादर

तथापि, या दरम्यान गणेश लंके व इतर या याचिकाकर्त्यांनी मा. दिवाणी न्यायालय, पंढरपूर येथे दावा दाखल केला व यामध्ये न्यायालयाने स्थगिती दिल्याने सदरचे काम करता आले नव्हते. त्यानंतर मा. जिल्हा न्यायालय, सोलापूर व मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ कोल्हापूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मंदिर समितीने घेतलेल्या भूमिकेला यांनी दि. 7 ऑगस्टरोजी दिलेल्या अंतिम आदेशाद्वारे महत्त्वपूर्ण न्यायालयीन अधिमान्यता दिली आहे.

तथापि, न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर आषाढी यात्रा असल्याने श्रींच्या मूर्ती संवर्धनाचे त्यावेळी काम करता आले नाही. या संवर्धनाच्या कामासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करता यावी तसेच मूर्तीच्या पावित्र्याचे आणि सुरक्षेचे रक्षण करता यावे यासाठी दि.23 व 25 सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी (मुखदर्शन व पदस्पर्शदर्शन) पूर्णवेळ बंद ठेवण्यात येणार आहे. दि.22 सप्टेंबर रोजी पूर्णवेळ दर्शन सुरू राहणार असून, त्यादिवशी रात्री दर्शन बंद झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात येणार आहे. त्यामुळे दि. 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत मंदिर बंद राहील.

 Vitthal Rukmini Idol Conservation
Pandharpur Vitthal Rukmini Temple: रक्षाबंधन सणानिमित्त विठ्ठलास सोन्याची राखी

यापूर्वी चार वेळा लेपन...

श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची मूर्ती ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे केंद्रस्थान असून, पुरातत्त्व विभाग व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांचे मार्फत अत्यंत काळजीपूर्वक संवर्धनाचे कार्य केले जाणार आहे. यापूर्वी सन 1988, 2005, 2012 आणि 2020 या कालावधीत मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनास सुमारे पाच वर्षांचा कालावधी झाल्याने मूर्तींची नियमित देखभालीच्या अनुषंगाने मूर्तीला संरक्षक आवरण देण्यात येणार आहे. सदरची संवर्धनाबाबतची संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर व राज्य पुरातत्त्व विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांचे मार्फत पार पडणार आहे.

दि. 26 सप्टेंबर पासून दर्शन पूर्ववत सुरू

याकामी दि.23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची वारकरी, भाविक व नागरिकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे . दि. 26 सप्टेंबर पासून दर्शन पूर्ववत सुरू राहील, असे असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगितले.

 Vitthal Rukmini Idol Conservation
Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल मूती संवर्धन कार्यवाही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली

श्रींच्या मूर्तीची जतन व संवर्धनाची जबाबदारी मंदिर समिती अत्यंत गांभीर्याने पार पाडत आहे. मूर्तींच्या संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून पाहणी व तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात आले आहे. संबंधित सक्षम प्राधिकरणांच्या मान्यता आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मूर्तींच्या प्राचीन स्वरूपाला, पावित्र्याला किंवा धार्मिक परंपरांना कोणतीही बाधा येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेत भाविकांच्या श्रद्धेचा नितांत आदर राखून पारदर्शक पद्धतीने काम करण्यात येईल.

_डॉ.विलास वाहणे, सहा. संचालक, पुरातत्व विभाग, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news