

पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मंदिर समितीच्या भूमिकेला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने शुक्रवारी अंतिम आदेशाद्वारे न्यायालयीन अधिमान्यता दिल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून, श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या पुढील संवर्धनाची कार्यवाही तज्ज्ञ संस्था व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे.
या प्रक्रियेमध्ये मूर्तींच्या विद्यमान स्थितीचे तांत्रिक दस्तऐवजीकरण, आवश्यक वैज्ञानिक परीक्षण, तज्ज्ञांच्या शिफारशींचे पालन, योग्य लेपनची प्रक्रिया आणि संवर्धनानंतर नियमित निरीक्षण यांना प्राधान्य देण्यात येईल. मूर्ती संवर्धनाची तारीख मंदिर समितीच्या आगामी सभेत ठरवण्यात येईल.
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींची होणारी झीज व नुकसान रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या शिफारशीनुसार संवर्धनात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने घेतला होता. या कार्यवाहीस आक्षेप घेऊन श्री गणेश लंके व इतर या याचिकाकर्त्यांनी रिट याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना खंडपीठाने हा अंतिम आदेश पारित केला.