पंढरपूर : गाडगेबाबांनी बांधलेल्या धर्मशाळेतील सेवाकार्याला ब्रेक

पंढरपूर : गाडगेबाबांनी बांधलेल्या धर्मशाळेतील सेवाकार्याला ब्रेक
Published on
Updated on

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : 
श्री विठ्ठल दर्शनाकरिता महाराष्ट्र, कर्नाटकातून येणार्‍या भाविकांसाठी संत गाडगेबाबा यांनी पंढरपुरात मराठा समाज धर्मशाळा बांधली. तेथे मोफत निवासाची व भोजनाची व्यवस्था केली होती. पण मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या धर्मशाळेला देखभाल, दुरुस्तीअभावी घरघर लागलेली आहे. विश्वस्त हयात नाहीत. मुख्य इमारत सोडली तर इतर इमारतींची पडझड झाली आहे. अस्वच्छता वाढली आहे. एकीकडे गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन आयुष्यभर स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. मात्र, आता त्यांच्या हेतूला तिलांजली देण्यात येत असल्याचे चित्र आहे.

स्वच्छतेचा मूलमंत्र

संत गाडगेबाबांचा कार्यकाळ हा 23 फेब्रुवारी 1876 ते 20 डिसेंबर 1956 असा राहिला आहे. गाडगेबाबांनी समाजाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. स्वत: हातात झाडू घेऊन गावातील स्वच्छता करायचे. गावात साफसफाई करायचे. रात्री कीर्तन करायचे आणि यातून स्वच्छतेचा संदेश देत लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, अनिष्ठ प्रथा व रुढी दूर करायचे.

या बदल्यात गावकरी बाबांना पैसे गोळा करून द्यायचे तर याच पैशातून गाडगेबाबा शाळा आणि धर्मशाळा, वसतिगृहांची उभारणी करायचे. जनावरांवर होत असलेला अत्याचार थांबवण्यासाठी गोशाळा बांधल्या. गाडगेबाबा पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी 1920 ला संत गाडगेबाबा मराठा धर्मशाळेचे बांधकाम पूर्ण केले. स्टेशन रोडवर असलेल्या 17.5 एकर (साडेसतरा एकरा) जागेत धर्मशाळेची मुख्य इमारत, त्याला लागून अन्नछत्र, गोशाळा बांधल्या. गाडगेबाबांनी बांधलेल्या इमारतींमध्ये हॉल, खोल्यांची संख्या 300 आहे. दगड, शिसे व लाकडी बांधकाम असलेली तीन मजली इमारत गाडगेबाबांची आठवण करून देते.

पंढरपुरात तीन धर्मशाळा

गाडगेबाबांनी पंढरपुरात तीन धर्मशाळा बांधल्या आहेत. यात गाडगे महाराज मराठा धर्मशाळा 1920, गाडगे महाराज परीट धर्मशाळा 1944, गाडगे महाराज व संत चोखामेळा महारा धर्मशाळा 1934 यांचा समावेश आहे. पंढरपूर येथे भाविकांसाठी ही पहिली सार्वजनिक धर्मशाळा आहे. त्या काळात पंढरपुरात बहूजन समाजातील लोकांच्या निवासाची व्यवस्था नव्हती. ही अडचण ओळखून बाबांनी मराठा धर्मशाळेची स्थापना केली होती. मात्र, 2006 पासून या धर्मशाळेला घरघर लागली. आता एकही विश्वस्त हयात राहिला नसल्याने मोफत निवास व भोजन व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे.

अन्नछत्र बंद पडले. गोशाळा बंद पडली. त्यामुळे या ठिकाणी नगरपालिकेने शाळा सुरू केली आहे. एका इमारतीत जिल्हा परिषदेने वसतिग्रह सुरू केले होते. तेही बंद पडले आहे. सध्या येथील चारपैकी तीन इमारती स्वच्छता, देखभाल दुरुस्ती अभावी 300 कोटींची मालमत्ता धूळ खात पडून आहेत. स्टेशन रोडवरील मुख्य इमारतीचे 10 गाळे हे नाममात्र भाड्याने देण्यात आलेले आहेत. यातून फारसे उत्पन्न मिळत नाही.

भाविकांना मोफत किंवा नाममात्र भाडे

अशा अवस्थेतही येथे येणार्‍या भाविकांना मोफत किंवा नाममात्र भाडे आकरणे गरजेचे असताना त्यांच्याकडे जादा भाडे आकारणी केली जात आहे. यामुळे गाडगेबाबांचा मूळ उद्देश भाविकांसाठी मोफत निवास व्यवस्था व अन्नदान याला सध्याच्या व्यवस्थापनाकडून हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येते. गाडगेबाबांच्या येथील धर्मशाळेची एकूण जागा ही साडेसतरा एकर होती. यापैकी सध्या अडीच एकर जागाच शिल्लक आहे. विश्वस्त मंडळ हयात नसल्याने भाविकांची मोफत सेवा, भाविकांना अन्नदान करण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे.

गाडगेबाबांची जयंती व पुण्यतिथी ला व्यवस्थापकांकडूनच खर्च करुन साजरी करावी लागत आहे. बाबांच्या पश्चात बाबांच्या वास्तुरुपी कार्याला ब्रेक लावण्याचे काम व्यवस्थापनाकडून सुरू असल्याचे चित्र दिसून येते. येथे दोन व्यवस्थापक कार्यरत आहेत. संत गाडगेबाबांची आज दि. 23 रोजी जयंती आहे. या जयंतीच्या माध्यमातून तरी बाबांच्या वास्तूरूपी कार्याची दखल व देखभाल करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

धर्मशाळेचे विश्वस्त हयात नाही

संत गाडगेबाबा मराठा धर्मशाळेचे विश्वस्त हयात नाहीत. नवीन विश्वस्त मंडळ कार्यरत नाही. त्यामुळे स्वत: विश्वस्त म्हणवून घेणारे काहीजण या दुरवस्थेला कारणीभूत आहेत. जयंती व पुण्यतिथीलाही ते उपस्थित राहत नसतात. भजन, कीर्तन केले जात नाही. अन्नछत्र बंद आहे. बाबांच्या कार्याचा उद्देश बाजूला गेला आहे.

हे हि वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news