सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : देशात बेरोजगार, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाली आहे. महत्वाचे प्रश्न दुर्लक्ष होत असून धार्मिक धृवीकरण वाढत चालले आहे. मोदींमुळे देशाचे संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे. भारत देशाचे संविधान ,लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन मोदी सरकारला सत्तेपासून दूर करणे गरजेचे असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सिताराम येचुरी यांनी केली.
माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांच्या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशनासठी माकप माजी खासदार सिताराम येचुरी हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
येचुरी म्हणाले, देशभरामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे.धार्मिक आणि सांप्रदायिक धृवीकरणाच्या दिशेने देश नेण्याचा कुटील डाव भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप येचुरी यांनी यावेळी बोलताना केला. आगामी 2024 साली होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष एकत्रित येऊन मोदी सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. देशासाठी कुस्तीपटूंनी मोठे योगदान दिले आहे. मात्र त्यांनाही आता आंदोलनला उतरावे लागत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील तीनशे लोक गेल्या तीन वर्षापासून जेलमध्ये आहेत. त्यांची चार्जशीट सुद्धा दाखल झाली नाही. अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनाकडे सरकारचेही लक्ष नाही. असेही येचुरी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते उदय नारकर, सिद्धाप्पा कलशेट्टी, अशोक ढवळे, एडवोकेट शेख ,अनिल वासम आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयचा दुरुपयोग
भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून ईडी, सीबीआयचा दुरुपयोग करीत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास देण्यासाठीच ईडीचा ससेमिरा सुरू आहे. आतापर्यंत 5 हजार 700 केस झाल्या आहेत. त्यापैकी फक्त 23 लोकांवर आरोप सिद्ध झाले असल्याचे येचुरी यांनी सांगितले.
मोदींनी संसदेचे उद्घाटन नव्हे तर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला
दिल्ली येथील नवीन संसदेचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र मोदींनी संसदेचे उद्घाटन केले नाही तर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आहे. वास्तविक पाहता संसदेची पूजा पाठ करण्याची गरज नव्हती. संसदेचा कारभार सुधारण्याची गरज आहे अशी अपेक्षाही येचुरी यांनी व्यक्त केली.
उत्तरप्रदेश सह महाराष्ट्रातील विविध शहरातील नामांतर होत आहेत. याविषयी माजी खासदार येचुरी यांना विचारले असता ते म्हणाले, नामांतर केल्यास विकास होणार आहे का? नामांतर केल्यास इतिहास बदलणार आहे का असा सवाल उपस्थित करीत ते म्हणाले, हिंदू मुसलमान यांच्यामध्ये तणाव निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. नामांतर करून हिंदूचे मतदान आपल्याकडे कशा पद्धतीने येईल यासाठीच नामांतर सुरू आहे.
.हेही वाचा