

Abu Azmi on Pandharpur Palakhi
सोलापूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहिलेले समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. महाराष्ट्रात ठिकठिकाणांहून वारकऱ्यांच्या पालखी पंढरपूरकडे रवाना झालेल्या असतानाच त्यावरच आजमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाहीत. मात्र मुस्लिमांनी 10 मिनिटे रस्त्यावर नमाज पठण केल्यावर आमच्यावर कारवाया होतात, असे वक्तव्य आझमी यांनी केले आहे.
पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, रस्त्यावर हिंदूचे अनेक सण साजरे केले. त्यावेळी कोणताही मुस्लिम व्यक्ती हिंदू सणांविरोधात तक्रार करत नाही. तर मग मुस्लिम व्यक्ती दहा मिनिटासाठी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर तक्रारी का केल्या जात आहेत. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्याचा पासपोर्ट रद्द करू अशी धमकी दिली आहे, असेही आ. आझमी म्हणाले.
दरम्यान, शरद पवार एक मोठे नेते आहेत. शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली ते केवळ ईडी आणि इन्कम टॅक्स यांच्यामुळे सोडली आहे, असेही ते म्हणाले.
राज उद्धव एकत्र आले तर शिवसेनेची ताकद कमी होऊ शकते. दोघा भावांची ताकद आणि दोघांमधली दिवार ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकाच घरात जन्माला आले आहेत, त्यांनी एकसाथ राहावे. त्यात आम्हालाही आनंद आहे. राज ठाकरेंची काही ताकद नाही ते फक्त द्वेषाचे राजकारण करतात. दररोज हिंदी किंवा उत्तर भारतीयांविरोधात बोलणे हेच राज ठाकरेंचे काम आहे, असेही आझमी म्हणाले.
आझमी म्हणाले, भाषेसाठी संसदेत एक कमिटी आहे. 45 मेंबर आहेत. ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. केंद्र सरकारचे पूर्ण काम हिंदीतून असतं. महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे. महाराष्ट्र जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे.
ते म्हणाले, बाळा नांदगावकर हे जनतेची दिशाभूल करत आहेत. मनसेचे 14 आमदार आले होते आता ते झिरो झाले आहेत. माझे शिक्षण इथे झाले नाही तरी मी मराठीसाठी प्रयत्न करतो. तरीपण मी मराठीची इज्जत करतो. मराठीचा सन्मान झाला पाहिजे पण हिंदीचा अपमान झाला नाही पाहिजे.
मराठी भाषा हा मुद्दाच नाही. फालतू मुद्दे काढू नका. महाराष्ट्रत राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणच मराठीचा द्वेष करत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे जी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत तिचा सन्मान झाला पाहिजे.
आझमी म्हणाले, आम्हाला वाटतं इराणला पाठिंबा दिला पाहिजे. आताच सरकार आहे ते फक्त निवडणुका जिंकण्या पुरत गोष्टी करतं. ज्या मोठ्या मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोग यांच्या हाताचे खेळणं झाला आहे.
अमेरिका म्हणते भारत पाकिस्तान युद्ध त्यांनी बंद केले हा आपला अपमान आहे. इस्राइलने पॅलेस्टाईनवर हल्ला केला त्यावेळेस अमेरिका काही बोलत नाही. इस्रायलने पहिला हल्ला इराणवर केला. इराणच्या नेत्यांमध्ये भारताचं रक्त आहे.
त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. पण काही लोक स्वतःची शस्त्र विकण्यासाठी युद्ध करतात त्याचा निषेध झाला पाहिजे.