सोलापूर जिल्ह्यात ‘वेळा अमावास्या’ साजरा

सोलापूर जिल्ह्यात  ‘वेळा अमावास्या’ साजरा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

'छज्जी रोट्टी चवळीकाई चांगभलं' म्हणत अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढासह परिसरात मोठ्या उत्साहात वेळा आमवस्या सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा वेळा आमवस्या रविवार आल्याने शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात शेतात जाऊन वेळा आमवस्या साजरा केले.

वेळा अमावास्या हा सण कर्नाटकातून महाराष्ट्रात आला असून, सोलापूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या अक्कलकोट व दक्षिण सोलापूर, मंगळवेढा उत्तर तालुक्यातील काही गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाही तालुक्यात रब्बीचे पीकदेेेेखील जोमात असल्याचे दिसून आले. आज संपूर्ण शहरी भागातील नागरिक आपल्या कुटुंबासहित मित्रपरिवारासह ग्रामीण भागात हजेरी लाऊन शेतात खोप बांधून काळ्या आईची पूजा करताना दिसून आले. वेळा अमावास्या सणामुळे तालुक्यात अघोषित संचारबंदी असल्याचे दृश्य दिसून आले.

यंदा अमावास्या रविवारी आल्याने शहरातील नागरिक घरातील सर्व जेवणाचे साहित्य बांधून शेतात सणासाठी गेले होते. शेतातील लक्ष्मी पूजन व पांडव पूजन करुन शेतकरीबांधव 'छज्जी रोट्टी चवळीकाई चांगभलं'चा गजर करीत संपूर्ण शेतशिवार दणाणून सोडले. या विधीवत पूजेला भाजी, भज्जी, तीळगूळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लाऊन केलेले आंबिल अशा विविध पदार्थांचा आस्वाद घेताना दिसून आले. या सणाला शेतीच्या रब्बी हंगामाची पार्श्वभूमी आहे.

दर्शवेळा अमावास्या या सणाला ग्रामीण भागात वेळा अमावास्या असे म्हटले जाते. हा सण काळ्या आईची पूजा करण्यासाठी केला जातो. अलीकडे बैलांची संख्याच घटल्याने आता ग्रामीण भागातील ग्रामस्थही चारचाकी वाहनातून शेताला जात आहेत. या सणाला शासकीय सुट्टी नसते, पण यंदा हा सण रविवारी सुट्टीच्या दिवशी आल्याने संपूर्ण शहरी लोकांची गर्दी ग्रामीण भागात पाहायला मिळाली.

शेतात पांडव पूजा व लक्ष्मी पूजा साजरी करुन झाल्यावर या सणासाठी विशेष पदार्थ म्हणून भज्जी आणि आंबिल तयार करतात. जेवणामध्ये भाकर, पोळी, आंबिल, भज्जीवर कढवलेले तेल, खीर, गोड भात, गूळ पोळी, धपाट्यासोबत कांदा, मुळा, गाजर, बोरे, मिरचीचा ठेचा, लोणचं, दही आणि बरेच काही, असा बेत असतो.

रविवारमुळे शेतात गर्दी

यंदा अमावास्या रविवारी आल्याने सोलापूर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात शेतात जाऊन वेळा अमावास्या सण साजरा केला. दोन वर्षांपासून कोरोनामुळे गतवर्षी वेळा अमावास्या मनाप्रमाणे साजरी करता आली नाही. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात हा सण शेतकर्‍यांनी साजरा केला.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news