सोलापूर : आखाती देशातील खजुराची बार्शीच्या रानात रुजवण | पुढारी

सोलापूर : आखाती देशातील खजुराची बार्शीच्या रानात रुजवण

सोलापूर; जगन्नाथ हुक्केरी : कमी पाऊस, वाळवंटात खजुराचे उत्पादन घेतले जाते. यासाठी आखाती देश प्रसिद्ध आहेत. भारतात राजस्थान, गुजरात येथील वाळवंटात हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून खजुराची लागवड केली जाते. हे खजूर आता सौंदरे (ता. बार्शी) येथील रानात पिकत (खजुराची बार्शीच्या रानात रुजवण) आहे. राजाभाऊ देशमुख यांनी याची यशस्वी शेती केली असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ही शेती आकर्षण ठरत आहे.

खजुराची शेती ही प्रामुख्याने जास्त उष्ण हवामान व कमी पर्जन्यमान असलेल्या भागात केली जाते. सोलापुरात पर्जन्यमान बर्‍यापैकी आहे. तरीही खजुराच्या पिकासाठी वातावरण पोषक आहे. याचा अभ्यास करुन राजाभाऊ देशमुख यांनी २००८ साली खजुराची (खजुराची बार्शीच्या रानात रुजवण) लागवड केली. रोपे न लावता बियापासूनच त्याची लागवड केली आहे. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात या झाडाला फुले येतात. या फुलांचे फळात रूपांतर होऊन जून महिन्याच्या दरम्यान खजुराची तोडणी केली जाते.

या बागेला उन्हाळ्यात थोडेफार पाणी लागते. या झाडांना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी नसले तरी चालते. या झाडांची लागवड १८ बाय १८ वर केली असून या बागेमध्ये शेवगा, सिताफळ यासह अन्य आंतरपीकही घेण्यात आले आहे. पाण्यासाठी ठिंबक सिंचनचा वापर करण्यात आला आहे. बार्शीच्या बाजारात पिकलेल्या खजुराला स्थानिक बाजारपेठांसह पुणे, मुंबईसह देशातील अन्य बाजारात मोठी मागणी आहे.

बदलते वातावरण, नवीन तंत्रज्ञान, उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करुन सध्या शेतकरी पारंपरिक शेतीला छेद देत नवनवीन पीक घेत आहेत. यात त्यांना यशही मिळत आहे. सौंदरे येथील राजाभाऊ देशमुख यांनी ड्रॅगन फ्रूटच्या एका रोपाची लागवड करुन त्याद्वारे स्वतःच्या नर्सरीत असंख्य रोपे तयार केली. त्याच रोपांच्या आधारे आज ड्रॅगन फ्रूटची बागच फुलविली आहे. त्यांची शेती बार्शी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सौंदरे हद्दीत आहे.

नवनवीन प्रयोग करत २५ एकर क्षेत्रात खजूर, ड्रॅगन फ्रूट, द्राक्ष, सीताफळाचे उत्पादन घेतले आहे. २५ एकरामध्ये तीन एकर खजूर, चार एकरामध्ये द्राक्ष, सात एकरमध्ये ड्रॅगन फूट, दहा एकर शेतात सीताफळाच्या दोन वेगवेगळ्या जातीच्या रोपांची लागवड केली आहे. याशिवाय शेवगा, चिंच याचे आंतरपीक त्यांनी घेतले आहे.

ड्रॅगन फ्रुटच्या तीन वेगवेगळ्या जाती

ड्रॅगन फ्रुटची सात एकरात लागवड केली असून त्यामध्ये तीन प्रकारची विविध रोपे आहेत. यामध्ये आलियास व्हाइट हे ड्रॅगन फ्रूट आहे. जे फोडल्यानंतर आतून पांढर्‍या रंगाचे दिसते. पिंक पर्पल व सी. एम. रेड म्हणून नवीन प्रकारचे ड्रॅगन फ्रूट आहे. त्याचीही लागवड केली आहे. या ड्रॅगन फ्रूट रोपांची लागवड १२ बाय ८ फुटांवर केली आहे. पांढर्‍या रंगाच्या ड्रॅगन फ्रुटचा जो प्लाट आहे, तो सर्वात जुना म्हणजे ४ ते ५ वर्षापूर्वीचा आहे. त्यांच्यानंतर रेड ड्रॅगन फ्रुटची रोपे हळूहळू वाढवली आहेत. या झाडांना फळे लागली असून याची उत्पादित फळे पुणे आणि मुंबईच्या मार्केटला पाठविली जातात असे विशाल देशमुख यांनी सांगितले.

सिताफळाच्याही दोन जाती

सिताफळाच्या दोन जातीच्या झाडांची लागवड केली आहे. त्यामध्ये बाळनगर आणि अनिनाटो यांचा समावेश आहे. या सिताफळाच्या झाडांना जून ते जानेवारी महिन्यापर्यंत पाणी लागत नाही. सिताफळाच्या झाडांना सहा महिने पाणी लागते तर सहा महिने पाणी लागत नाही. सिताफळाच्या झाडांना लागवड केल्यापासून तिसर्‍या ते चौथ्या वर्षांपासून फळ लागायला सुरुवात होते. पाचव्या ते सहाव्या वर्षी एका झाडाला कमीत- कमी २५ किलो सिताफळे मिळू शकतात.

स्वत:च्या नर्सरीत रोपे केली तयार

देशमुख यांच्या शेतात स्वत:ची एक नर्सरी असून त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट, सिताफळ, खजूर व विविध प्रकारची रोपे तयार केली जात आहेत. यामुळे खर्चाची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अनेकांना मिळाला रोजगार

फळबागा व त्यातील आंतरपीक व इतर कामांसाठी मनुष्यबळाची गरज असते. यासाठी घरची आणि कामगार माणसे राबतात. यात १५ महिला व आठ पुरुष असे एकूण सध्या २३ आणि कधीकधी त्याहून जास्त म्हणजे, २५ कामगार लागतात. यातून २५ कामगारांना रोजगार मिळतो. जिल्ह्यात उसाची शेती केली जात असताना आमच्याकडे पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे आम्ही फळबागांकडे वळलो. आमच्या भागात नदी अगर कॅनॉल नाही. आमची शेती विहिरीवर अवलंबून आहे. त्यामुळे उसापेक्षा आम्हाला फळबागा चांगल्या वाटल्या. उसामध्ये काम करायचे आणि परत पैशासाठी कारखान्याच्या मागे लागावे लागते. पैसे मिळायला परत वर्ष जाते. यामुळे फळबागा फायदेशीरच आहे.
-राजाभाऊ देशमुख (शेतकरी, सौंदरे, बार्शी)

हेही वाचलंत का? 

Back to top button