दहिवडी नगरपंचायत शिवसेना लढवणार : शेखर गोरे - पुढारी

दहिवडी नगरपंचायत शिवसेना लढवणार : शेखर गोरे

दहिवडी;  पुढारी वृत्तसेवा : पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार दहिवडी, ता. माण येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना मोठ्या ताकदीने उतरणार असल्याची माहिती माण खटावचे शिवसेना नेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी दिली.

शेखर गोरे म्हणाले, दहिवडी ग्रामपंचायतीवर आपल्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व स्थापित केले होते. दहिवडीत आपल्याला मानणारा मोठा गट असून शिवसेनेच्या माध्यमातून या गटाच्या पाठीशी मोठी ताकद उभी करणार आहे. नगरपंचायतीच्या या निवडणुकीत शिवसेना सर्व 17 जागांवरती उमेदवारी अर्ज भरणार असून या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालून जबाबदारी घेणार आहे.

दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणची नगरपंचायत ही आदर्शवत असणे गरजेचे आहे.आपल्याकडे काही दिवसच ग्रामपंचायत असताना आपण ग्रामपंचायतीचा चेहरामोहरा बदलला होता. मात्र ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर आपल्या हातून सत्ता गेली. नगरपंचायतींना मोठा निधी येऊनही विरोधकांना दहिवडीचा विकास करता आला नाही. विरोधकांनी या नगरपंचायतीचा फक्त पदापुरता वापर करत सत्ता भोगल्याचीही टिका त्यांनी केली. दहिवडीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व विकासकामांचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी आपण यावेळी शिवसेनेच्या माध्यमातूम पॅनल टाकत मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरणार असल्याची माहितीही माण खटावचे शिवसेना नेते शेखर गोरे यांनी दिली.

Back to top button