पुढारी ऑनलाईन : दक्षिण सोलापूरच्या कुंभारी येथील रे नगरमधील पहिल्या टप्प्यातील १५ हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज झाला. यावेळी बोलताना पीएम मोदी यांनी तुमची स्वप्न, माझा संकल्प हीच मोदींची गॅरंटी असल्याचे सांगितले. (PM Modi Solapur Visit)
पीएम आवास योजनेतर्गंत आज देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे आज लोकार्पण झाले. आज १ लाखांहून अधिक कुटुंबाचा गृह प्रवेश होत आहे. यामुळे मला खूप आनंद होत असल्याची भावना पीएम मोदी यांनी व्यक्त केली. या गरीब लोकांचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी ठेव असल्याचे सांगत पीएम मोदी यावेळी भावूक झाले.
आज एक गॅरंटी पूर्ण केली. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी आहे. लाखो रुपयांची घरे ही तुमची संपत्ती आहे. ज्या कुटंबांना आज घर मिळाले आहे त्यांनी अनेक पिढ्या कष्ट झेलले. आज कामगारांना घर मिळत आहे याचा मला मोठा आनंद असल्याचे ते म्हणाले.
आमचे सरकार पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे की, श्रीरामाच्या आदर्शांचे पालन करून देशात चांगले प्रशासन व्हावे आणि देशात प्रामाणिकपणाचे सरकार व्हावे. हे रामराज्य आहे ज्याने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि प्रत्येकाच्या प्रयत्नाला प्रेरणा दिली.
२०१४ मध्ये आमचे सरकार स्थापन होताच मी म्हणालो होतो, 'माझे सरकार गरिबांना समर्पित सरकार आहे.' त्यामुळे आम्ही एकापाठोपाठ एक योजना लागू केल्या ज्यामुळे गरिबांच्या अडचणी कमी होऊन त्यांचे जीवन सुसह्य होईल. (PM Modi Solapur Visit)
यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.
आपल्या देशात दीर्घकाळ गरिबी हटावचा नारा दिला गेला पण गरिबी काही हटली नाही. गरिबांच्या नावावर योजना केल्या, पण त्याचा लाभ गरिबांना मिळाला नाही. मध्यस्थ त्यांच्या हक्काचे पैसे लुटायचे, असे सांगत पीएम मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
ही वेळ आपल्या सर्वांसाठी भक्तीमय आहे. तो ऐतिहासिक क्षण २२ जानेवारीला येणार आहे, जेव्हा आपले प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होतील. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी रामज्योती प्रज्वलित करावी असे सांगत रामज्योती प्रज्वलित करणार का? या पीएम मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थितांनी मोबाईलचा प्लॅश दाखवत प्रतिसाद दिला.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच महिलांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यात वाईडिंग कामगार शैलाबाई तोळणूर, विडी कामगार रजिता मडूर, विडी कामगार रिझवाना मकानदार, घरकाम करणाऱ्या सुनीता जगले, शिलाई कामगार बाळाबाई वाघमोडे या पाच महिलांचा समावेश होता.
हे ही वाचा :