PM Modi Solapur Visit | सोलापूर : असंघटित कामगारांना मिळाले हक्काचे घर, पीएम मोदींच्या हस्ते १५ हजार घरकुलांचे लोकार्पण | पुढारी

PM Modi Solapur Visit | सोलापूर : असंघटित कामगारांना मिळाले हक्काचे घर, पीएम मोदींच्या हस्ते १५ हजार घरकुलांचे लोकार्पण

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा, कुंभारी (दक्षिण सोलापूर) येथील रे नगरमधील पहिल्या टप्प्यातील १५ हजार असंघटित कामगारांच्या घरकुलांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी (दि. १९ जानेवारी) झाला. (PM Modi Solapur Visit)

‘या’ लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द

पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच महिलांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यात वाईडिंग कामगार शैलाबाई तोळणूर, विडी कामगार रजिता मडूर, विडी कामगार रिझवाना मकानदार, घरकाम करणाऱ्या सुनीता जगले, शिलाई कामगार बाळाबाई वाघमोडे या पाच महिलांचा समावेश आहे.

पीएम आवास योजनेतर्गंत आज देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे आज लोकार्पण झाले. आज १ लाखांहून अधिक कुटुंबाचा गृह प्रवेश होत आहे. यामुळे मला खूप आनंद होत असल्याची भावना पीएम मोदी यांनी व्यक्त केली. या गरीब लोकांचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी ठेव असल्याचे सांगत पीएम मोदी यावेळी भावूक झाले.

पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे साडेतीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रे नगर येथे असंघटित कामगारांसाठी ३० हजार घरांचा प्रकल्प साकारत आहे. हा आशिया खंडातील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाला.

या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंग पुरी, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, रे नगरचे प्रवर्तक माजी आ. नरसय्या आडम, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांची उपस्थित होते. (PM Modi Solapur Visit)

पंतप्रधान मोदी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची मूर्ती भेट देण्यात आली. फिर एक बार मोदी सरकार असा नारा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

आडम यांना पाच मिनिटांचा वेळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्यासपीठावर रे-नगर गृहप्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार आडम मास्तर यांना स्थान देण्यात आले. त्यांनी यावेळी भाषण केले. त्यांना भाषणासाठी पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला होता.

दीड लाख नागरिक बसतील असा शामियाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी १५ एकरांमध्ये पाच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. यामंडपामध्ये दीड लाख लोक बसतील अशी तयारी आहे.

 हे ही वाचा :

 

Back to top button