सोलापूर: गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणारी टोळी गजाआड; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

सोलापूर: गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणारी टोळी गजाआड; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

कामती: पुढारी वृत्तसेवा : एलपीजी गॅसने भरलेल्या टँकरमधून धोकादायकरित्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता. हा गॅस काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या टोळीचा कामती पोलिसांकडून पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून एकूण ६० लाखांचा मुद्देमाल जप्त जप्त करण्यात आला आहे. कामती पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे यांनी ही कारवाई केली. दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर- मंगळवेढा महामार्गावरील सोहाळे हद्दीतील हॉटेल शिवराज पॅलेसच्या पाठीमागील जागेत बेकायदेशीर गॅस भरत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून समजली. घटनेची गंभीरता समजून सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस भरत चौधरी, अमोल नायकोडे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी टँकरमधून गॅस काढला जात होता. यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यावेळी गॅस टँकर, टुलकीट साधने, गॅस सिलेंडरच्या रिकाम्या आणि काही भरलेल्या टाक्या, त्याचबरोबर काळ्या बाजारात सदर गॅसच्या टाक्या विक्रीसाठी नेण्यासाठीचे चारचाकी वाहन, असा एकूण ६० लाख रुपयांचा मुद्देमाल कामती पोलिसांनी जप्त केला. या कारवाईबद्दल सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे आणि कामती पोलिसांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा 

Back to top button