सोलापूर : दिग्गजांच्या प्रवेशाने बीआरएसची वातावरणनिर्मिती | पुढारी

सोलापूर : दिग्गजांच्या प्रवेशाने बीआरएसची वातावरणनिर्मिती

वेणुगोपाळ गाडी

सोलापूर :  गत चार महिन्यांपासून भारत राष्ट्र समितीमध्ये (बीआरएस) म्हणावे तसे इनकमिंग होत नसल्याने हा पक्ष सोलापूर शहरात रुजेल काय, याबाबत साशंकता होती. मात्र, पूर्व भागाच्या दोन दिग्गजांच्या प्रवेशामुळे या पक्षाची चांगलीच वातावरणनिर्मिती झाली आहे.

बीआरएसचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे संपूर्ण भारतात या पक्षाचे जाळे पसरू इच्छितात. कारण त्यांंना हा पक्ष राष्ट्रीय स्तरावरचा करावयाचा आहे. पक्ष विस्तारासाठी त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य निवडले. नांदेडमधून त्यांनी महाराष्ट्रात चंचूप्रवेश केला. यानंतर अन्य जिल्ह्यांकडे या पक्षाने आपला मोर्चा वळविला असतानाच सोलापूर शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले. याचे कारण होते या शहरात लाखोंच्या संख्येने असलेले मूळ तेलंगणावासीय तेलुगू लोक. बीआरएस हा तेलंगणाचा पक्ष असल्याने सोलापूरच्या तेलुगूपट्ट्यातून मोठ्या संख्येने विविध पक्षांमधील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नवीन कार्यकर्ते या पक्षात येतील अशी अटकळ होती; मात्र तसे चित्र दिसत नव्हते. 15 दिवसांपूर्वी केसीआर यांच्या दौर्‍याने मात्र हे चित्रच पालटले. केसीआर यांनी सोलापूर भेटीत नागेश वल्याळ यांच्यासह भाजपच्या अनेक माजी नगरसवेकांची भेट घेऊन त्यांना भाजपची ऑफर दिली होती. त्यास प्रतिसाद देत नागेश वल्याळ, संतोष भोसले, राजश्री चव्हाण, जुगन अंबेवाले या भाजपच्या माजी नगरसेवकांनी तसेच पद्मशाली शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ गोप यांनी शनिवारी बीआरएसमध्ये प्रवेश केला.

सुमारे 80 गाड्यांचा ताफा व 400 समर्थक-कार्यकर्त्यांना घेऊन केसीआर स्टाईल वल्याळ व गोप यांनी हैदराबादचा दौरा केला. याची जोरदार चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात तसेच जनमानसांत झाली. यामुळे बीआरएसची मोठी वातावरणनिर्मिती झाली आहे.

सध्या पूर्व भागासह शहरात बीआरएस हा चर्चेचा विषय ठरला आहे. हैदराबादमधील बीआरएसचे मुख्यालय असलेल्या तेलंगणा भवनात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी केसीआर यांनी लवकरच आपण दुसर्‍यांदा सोलापूरला येऊ तसेच दोन लाख लोकांच्या उपस्थितीत सभा घेण्याची घोषणाही केली. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना आणखीन वेग येणार आहे. विविध पक्षांची फोडाफोडी करुन त्यामधील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केसीआर यांच्या उपस्थितीत प्रवेश देणे अपेक्षित आहे. वल्याळ व गोप हे दोघेही दिग्गज मानले जातात. लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात बीआरएसच्या कामाला सुरुवात होईल. नवीन सदस्य नोंदणीबरोबरच केसीआर यांच्या सभेची जोरदारी तयारी होणार आहे. सोलापूरला आयटी पार्क देण्यासह सर्वांगीण विकासाचा शब्द केसीआर यांनी शनिवारी हैदराबादमध्ये दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता सोलापुरात येऊन आणखीन काय महत्त्वपूर्ण घोषणा करणार, याकडे पूर्व भागासह सार्‍या शहराचे लक्ष लागले आहे.

Back to top button