सोलापूर : गांजा ओढण्यास विरोध केल्‍याने महंतावर हल्‍ला | पुढारी

सोलापूर : गांजा ओढण्यास विरोध केल्‍याने महंतावर हल्‍ला

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हनुमान मंदिरवजा मठात गांजा ओढण्यास हरकत घेतल्यामुळे समाजकंटकांच्या टोळक्याने महंतावर सशस्त्र हल्ला केला. दुपारी हा प्रकार घडल्यानंतर जखणी महंतास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राम कृपाळू दास महाराज (वय ५३) असे जखमी महंताचे नाव आहे.

एसटी बसस्थानकापासून जवळच असलेल्या मुरारजी पेठेत निराळे वस्ती रस्त्यावर राज राजेश्वरी हनुमान मंदिर आहे. या मंदिरात साधूंचा मठ असून, तेथे देशाच्या विविध भागातून आलेले साधू, महंत वास्तव्य करतात. या मठात भाविकांची वर्दळ असते. परंतु काही समाजकंटकांचे टोळके गांजा ओढण्यासाठी मठात घुसखोरी करतात. साधू, महंत आणि भाविकांचा विरोध झुगारून गांजा ओढण्याचा समाजकंटकांचा कार्यक्रम सुरूच असतो. त्यांना गांजा ओढण्यास विरोध करून मंदिरातून हाकलण्याचा प्रयत्न केला असता, समाजकंटकांनी महंत राम कृपाळू दास महाराजांवर सशस्त्र हल्ला केला. यात त्यांच्या गळ्यावर आणि हनुवटीवर गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर हल्ला होताना इतर साधूंनी तात्काळ धावून येत हल्लेखोर समाजकंटकांच्या तावडीतून महंतांची सुटका केली.

यासंदर्भात संबंधित साधूंनी प्रसार माध्यमांशी बोलताना पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात यापूर्वी तक्रार देऊनसुध्दा कारवाई होत नाही. संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई न झाल्यास मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्याचा इशारा साधूंनी दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button