सोलापूर : घरफोड्या करणाऱ्या आंतराज्य टोळीचा पर्दाफाश; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

सोलापूर : घरफोड्या करणाऱ्या आंतराज्य टोळीचा पर्दाफाश; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिवसा घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीकडून करून सुमारे १०० तोळे सोने आणि २०० तोळे चांदी तसेच एक कार असा सुमारे ६० लाखांचा माल हस्तगत करण्याची मोठी कामगिरी गुन्हे शाखेने केली.

पवन ऊर्फ भुरा रामदास आर्य (वय ३८, रा. रामकृष्ण बाग, इंदौर, मध्यप्रदेश), मनोजकुमार ऊर्फ राहूल ठाकूरदास आर्य (वय ३२, रा. खाटीक मोहल्ला भिंड, मध्यप्रदेश), दिपेंद्रसिंग ऊर्फ चिंटू विजयसिंग राठोर (वय ४१, रा. ए राजनगर, इंदौर, मध्यप्रदेश) व देवेंद्र ऊर्फ राज रामलाला गुर्जर (वय ३७, रा. गंगानगर, इंदौर, मध्यप्रदेश) तसेच अनिल श्रीमंत पवार (वय ३५, रा. पानमंगरूळ, ता.अक्कलकोट), प्रित्या ऊर्फ घुल्या झिझिंग्या पवार अशी अटक केलेल्या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत.

पोलिसांनी पवन आर्य, मनोजकुमार आर्य, दिपेंद्रसिंग राठोड, देवेंद्र गुर्जर यांच्याकडून ७५२ ग्रॅम सोने, १ हजार ५७९ ग्रॅम वजनाचे चांदीचे ३ ताट, रोख चार लाख रुपये व कार असा एकूण ५४ लाख ५४ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींकडून सात गुन्हे उघडकीस आले आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यात जिल्ह्यात पाच घरफोडी केल्याप्रकरणी अनिल पवार यास अटक केली. त्याच्याकडून पाच लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात आरोपीने १३ घरफोडी व एक मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले.

दरम्यान, बार्शीमधील सुभाष नगरात ६ एप्रिल रोजी दिवसा आरोपींनी घर फोडून ७ लाख ८५९ हजारांचा मुद्देमाल चोरी केली होता. या गुन्ह्याच्या शोधातील पोलिसांना चोरट्यांनी मोहोळ, सांगली, कर्नाटकातील कलबुर्गी, तेलंगणातील सायराबाद येथे चोरी केल्याची माहिती मिळाली.

शिवाय ही टोळी मध्यप्रदेशातील इंदौर येथील असल्याचेही समोर आले. हे आरोपी धुळे जिल्ह्यातील सोनगिरी पोलीस ठाणे हद्दीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित कार व त्यातील दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर आरोपींनी राज्यातील विविध शहरात चोरी केल्याची कबुली पथकाला दिली. चोरीतील सोने इंदौर मधील सराफाकडे दलालामार्फत लगड करून विकल्याची माहिती तपासात समोर दिली. पोलिसांनी चोरीचे सोने घेणारा सराफ दीपेंद्रसिंग गुर्जरला ताब्यात घेऊन सोने जप्त केले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सपोनि धनंजय पोरे, पोसई राजेश गायकवाड, ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अनिस शेख, अक्षय दळवी, व्यंकटेश मोरे, अक्षय डोंगरे, समीर शेख, सहाय्यक फोजदार बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, आबासाहेब मुंढे, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, रवि माने, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, सुनंदा झळके, दिलीप थोरात, व्यंकटेश मोरे यांनी केली.

अधिक वाचा :

Back to top button