बीड : वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात; भाजपाचा पराभव | पुढारी

बीड : वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात; भाजपाचा पराभव

वडवणी (बीड); पुढारी वृत्तसेवा : वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीच्या मतदानाला शुक्रवार (दि. २८) रोजी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. निवडणुकीमध्ये ९९.१८ टक्के मतदान झाले आहे. मतदान झाल्यानंतर अवघ्या एका तासात धक्कादायक निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीच्या शेतकरी महाविकास आघाडी पॅनलने १८ पैकी १८ जागेवर विजय मिळवत भाजपाच्या शेतकरी aविकास पॅनलचा पराभव करत कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. महाविकास आघाडीकडून आमदार प्रकाश साळुंखे, माजी आमदार केशवराव आंधळे, बहुजन विकास मोर्चा संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली.

तर, भाजपकडून राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली. यामध्ये आमदार प्रकाश सोळंके व माजी आमदार केशवराव आंधळे यांनी प्रतिष्ठापनाला लावत १८ पैकी १८ जागांवर एकहाती विजय मिळवत भाजपच्या राजाभाऊ मुंडे यांना धक्का दिला. या विजयानंतर वडवणी शहरातुन भव्य रॅली काढत जेसीबीच्या साह्याने गुलाल उधळत फटाक्याच्या आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी आमदार प्रकाश सोळंके माजी आमदार केशवराव आंधळे, बहुजन विकास मोर्चा संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, मानवी हक्क अभियान जिल्हाध्यक्ष राजेश घोडे, दिनकर आंधळे, विनायक मुळे, भारत जगताप, नगराध्यक्ष शेषेराव जगताप, संजय आंधळे, पंजाबराव शिंदे, बन्शीधर मुंडे, संभाजी शिंदे, दिनेश मस्के, बजरंग साबळे, प्रशांत सावंत, औदुंबर सावंत, बालु आंडिल, आनंद काळे, सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजाभाऊ मुंडे यांना एकापाठोपाठ तिसरा धक्का

माजी.आ. केशवराव आंधळे आणि राजाभाऊ मुंडे यांच्या दुरावा निर्माण झाल्याने माजी आ. केशवराव आंधळे आणि आ.प्रकाश सोळंके यांनी आघाडी केली आहे. आघाडी केल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, नगरपंचायत, आणि आता वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती, असे एकापाठोपाठ पराभव करत हा तिसरा धक्का राजाभाऊ मुंडे यांना दिला आहे.

हेही वाचा;

Back to top button