मराठवाड्यात पुणे पोलिसांचे ऑपरेशन दुचाकी; 14 चोरट्यांना अटक करत 54 लाखांच्या 162 दुचाकी जप्त | पुढारी

मराठवाड्यात पुणे पोलिसांचे ऑपरेशन दुचाकी; 14 चोरट्यांना अटक करत 54 लाखांच्या 162 दुचाकी जप्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहर परिसरासह इतर भागातून चोरी गेलेले तब्बल 162 वाहने शोधून काढली आहेत. ही वाहने लातूर, बीड, धराशिवसह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातून जप्त करण्यात आली असून 14 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे पोलिसांनी वाहनचोरांविरोधात आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते. यावेळी पत्रकार परिषदेला गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल पवार, नारायण शिरगावकर आदी उपस्थित होते.

शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना देण्यात आले होते. त्यानुसार गुन्हे शाखेतील युनिट सहा, पाच, चार, दोन, दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक दुचाकी चोरट्यांच्या मागावर होते.

सचिन प्रदीप कदम (वय 32, रा. कळंब, धाराशिव), अजय रमेशराव शेंडे (वय 32, रा. सहजपूर, ता. दौंड), परमेश्वर भैरवनाथ मिसाळ (वय 28, रा. कळंब, जि. धाराशिव), युवराज सुदर्शन मुंढे (वय 23, रा. सहजपूर, ता. दौंड) यांच्यासह एकूण 14 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ही वाहने जप्त करण्यात आली आहे. जवळपास एक महिना पोलिसांनी ही शोधमोहीम राबविली. गुन्हे शाखा युनिट सहाचे वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकातील उपनिरीक्षक सुरेश जायभाय, नितीन मुंडे, सचिन पवार यांना दुचाकी चोरट्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने लातूर, धारशिव, बीड भागात वेशांतर करून शोध मोहीम राबविली. आरोपी अजय शेंडे, शिवाजी गरुड यांना अटक केल्यानंतर त्यांनी साथीदारांच्या मदतीने पुणे परिसरातील दुचाकींची लातूर, धाराशिव, बीड परिसरात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरट्यांकडून मिळत गेलेल्या माहितीनुसार पथकाने तब्बल 100 दुचाकी जप्त केल्या. यातील आरोपी शेंडे चोरट्यांच्या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान युनिट पाचच्या पथकाने केलेल्या कारवाईत वैभव नागनाथ बिनवडे (वय 20, तिघे रा. हडपसर) याच्यासह तिघांना पकडले. त्यांच्याकडून पाच लाख 40 हजार रुपयांच्या 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बिनवडे सराईत चोरटा आहे. युनिट चारने समीर शेख (वय 29, रा. येरवडा) याच्यासह चौघांना अटक करीत पाच लाख 55 हजार रुपयांच्या 9 दुचाकी जप्त केल्या.

दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक दोनने किशोर उत्तम शिंदे (वय 30, रा. वेताळ वस्ती, मांजरी बुद्रुक), शाहिक कलिम शेख (वय 19, रा. दिगंबरनगर, वडगाव शेरी) यांच्यासह साथीदारांना अटक केली. चोरट्यांकडून 21 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. युनिट दोनने परभणीतील चोरटा भगवान राजाराम मुंडे (वय 32) याला अटक केली असून त्याच्याकडून 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, क्रांतीकुमार पाटील, उल्हास कदम, सुनील पंधरकर, गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, विवेक पाडवी, कृष्णा बाबर, विशाल मोहीते, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, गुंगा जगताप, जयदीप पाटील, अंमलदार नितीन मुंढे, सचिन पवार, रुषीकेश व्यवहारे, प्रमोद मोहीते, विठ्ठल खेडकर, अश्फाक मुलाणी, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, नितीन धाडगे, ज्योती काळे, रमेश साबळे, प्रताप गायकवाड, दया शेगर, महेंद्र पवार, हरीष मोरे, प्रवीण भालचिम, संजय आढारी, राजेश अभंगे, अशोक अटोळे, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव, संदीप येळे, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, मोहसीन शेख, उत्तम तारू, विनोद चव्हाण, विजय पवार, प्रमोद कोकणे आदींसह पथकाने ही कारवाई केली.

Back to top button