छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार लवकरच भारतात आणणार : सुधीर मुनगुंटीवार | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार लवकरच भारतात आणणार : सुधीर मुनगुंटीवार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत त्यांची ब्रिटनमध्ये असलेली भवानी तलवार आणि वाघ नख भारतात आणू, असा विश्‍वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोलापुरात आज (दि.२६) व्यक्त केला आहे. मुनगंटीवार कर्नाटकच्या प्रचारादरम्यान आज ते सोलापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.

मुनगंटीवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांची प्रेरणा कायम नव्या पिढीला मिळत रहावी, यासाठीच राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत त्यांची भवानी तलवार आणि वाघ नख हे ब्रिटनमधून भारतात आणण्यासाठी आपला अटोकाट प्रयत्न सुरु आहे. यासाठी ब्रिटन सरकारसोबत अनेक वेळा बैठका आणि चर्चा झाल्या आहेत. कारण ही भवानी तलवार आणि वाघ नख छत्रपतींच्या इतिहासाची साक्ष देणारी आहेत.

त्यामुळे त्या वस्तू भारतात आणि महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे. त्यासाठी 29 जुलै 1956 पासून शिवप्रेमींची मागणी आहे. की या वस्तू भारतात आणाव्यात. त्यासाठी राज्यशासन आणि केंद्र शासनाकडून ही पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्यासाठी ब्रिटन डेप्युटी जनरल ऑफ कौन्सिल अ‍ॅनम यांच्याशी चर्चा झाली असून या वस्तू भारतात दर्शनासाठी देण्याची त्यांनी तयारी दर्शविली असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

श्रीराम मंदिर बांधण्याचे वचन भाजपनेच पूर्ण केले

ज्याप्रमाणे श्रीरामाचे मंदिर अयोध्यामध्ये बांधण्याचा संकल्प भाजपने पूर्ण केला. त्या प्रमाणे आता छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार आणि वाघ नख ही भारतात आणणार, असा विश्‍वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, संघटक मकरंद देशपांडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button