सोलापुरात वन विभागाच्या ५०० एकरात होणार ऑक्सिजन पार्क : वन मंत्री सुधीर मुनगंटीवार | पुढारी

सोलापुरात वन विभागाच्या ५०० एकरात होणार ऑक्सिजन पार्क : वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

सोलापूर; महेश पांढरे :  सध्या ग्लोबल वार्मिंग ही जागतिक समस्या बनली आहे. यामुळे तापमान वाढत चालले असून याचा विपरित परिणाम निसर्गचक्रावर होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवडीवर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठीच सोलापूर जिल्ह्यात असलेल्या ५००  एकर जागेत वनउद्यान अर्थात ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

मुनगंटीवार हे कर्नाटकला जाण्यासाठी सोलापूर विमानतळावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, संघटक मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टिका करत पंढरपूरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अपूर्ण ठेवण्याचे पाप केले असल्याचा आरोप केला. पंढरपूरला येणार्‍या भाविकांना या सभागृहात आध्यात्मिक, सांस्कृतिक गोडी लागावी, यासाठी किर्तन आणि प्रवचन घेण्यात येणार होते. त्यासाठी राज्य शासनाने ६५ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र गतवेळच्या सरकारने यावर २५ कोटी खर्च झाले असतानाही पुढील काम केलेली नाहीत. त्यामुळे या नामसंकीर्तन सभागृहाचे काम अर्धवट राहिले आहे.  त्यासाठी आता शासनाने पुन्हा २० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. सर्व वारकर्‍यांना आणि पंढरपूरातील व्यापार्‍यांना सोबत घेवून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आ. सुभाष देशमुख यांनी मागणी केल्याप्रमाणे सोलापूरात वन विभागाची जवळपास ५०० एकर जमीन पडून आहे. त्यावर ऑक्सिजन पार्क उभारण्याची घोषणा त्यांनी केली होती. तसेच यासंदर्भात शहरवासियांच्या आणि जिल्ह्यातील तज्ञांच्या काही सूचना असतील तर त्या शासनाला तातडीने कळवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सोलापूरकरांना स्वच्छ आणि शुध्द हवा मिळावी तसेच पक्षांना निवारा मिळावा, यासाठी या ऑक्सिजन पार्कची मोठी मदत होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

प्रत्येक गावाचा आणि शहराचा असणार ट्री प्लॅन्टेशन प्लॅन

ग्लोबल वार्मिग ही जागतिक समस्या बनली जात असून निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. तो समतोल सावरण्यासाठी आता प्रत्येक ग्रामपंचायती आणि प्रत्येक शहराचा ट्री प्लॅन्टेशन प्लन तयार करण्यात येणार असून त्याची यशस्वी अमंलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी दिली आहे.

विकासाला बाधा येत असेल तर त्या आडचणी दुर करु

वन विभागाच्या अनेक पडीक जमिनी आहेत. मात्र वन विभागाच्या कडक नियमामुळे पायाभुत सुविधेला आडथळा निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेवून असे आडथळे दुर करता येतील, असा विश्‍वास व्यक्त केला. तसेच बोरामणी विमानतळासाठी वन विभागाची असलेली आडचण लवकरच दुर करु, असेही आश्वासन वन मंत्री मनगुंटीवार यांनी दिले.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button