Maharshtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपुरात, मुख्यमंत्रीही मुक्कामी; राजकीय वातावरण तापणार | पुढारी

Maharshtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपुरात, मुख्यमंत्रीही मुक्कामी; राजकीय वातावरण तापणार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (दि.२६) रात्री दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर हा त्यांचा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. आजच रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नागपूर मुक्कामी येत असल्याने राज्यातील सध्याच्या एकंदर घडामोडी पाहता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

उपराजधानीत देवेंद्र फडणवीस-अजित पवार असे समर्थकांचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पोस्टरयुद्ध दोन दिवस सुरूच आहे. गुरुवारी(दि.२७) सकाळी 10.30 वाजता जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवतदेखील उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते भाजपच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी (दि.२६) रात्री दहा वाजता दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. मंगळवारी (दि.२५) पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही झाली. वर्धा रोडवरील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये अमित शहा थांबणार असून, या हॉटेलबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात आहे. बीडीडीएसकडून एनसीआय परिसरात तपासणी केली जात आहे. अमित शहांसाठी स्पेशल बुलेटप्रूफ वाहनही नागपूरला आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील कार्यक्रमामुळे २६ व २७ एप्रिलला वाहतुकीत अंशत: बदल करण्यात येत आहे. नागपूर वाहतूक पोलीसांकडून वाहतुकीचे दृष्टीने विविध ठिकाणी वाहतूक वळवली जात आहे. वर्धा रोड, विमानतळाकडे जाणाऱ्या रोडवर रात्री व सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button