चैत्री यात्रेसाठी पंढरी सज्ज | पुढारी

चैत्री यात्रेसाठी पंढरी सज्ज

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा रविवारी (दि. २ एप्रिल) साजरा होत आहे. कोरोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्तपणे चैत्री यात्रा सोहळा साजरा होत आहे. यातच राज्य शासनाने महिलांना बससेवेत ५० टक्के सवलत दिल्याने महिला भाविकांची यात्रेत संख्या वाढणार असल्याने यंदा किमान चार लाख भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यादृष्टीने मंदिर प्रशासन, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन व नगरपालिका प्रशासन भाविकांना चांगल्या सेवासुविधा देण्यासाठी सज्ज होत आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या वर्षभरात माघी, चैत्री, आषाढी व कार्तिकी या चार महत्त्वाच्या यात्रा भरतात. या यात्रांना राज्यभरातून तसेच देशभरातून देखील भाविक हजेरी लावतात. या यात्रांपैकी चैत्री यात्रा देखील महत्त्वाची आहे. या यात्रेत जनावरांचा बाजार भरणार आहे. जनावरांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच राज्य परिवहन महामंडळाकडून महिलांना ५० टक्के प्रवास भाड्यात सवलत देण्यात आलेली आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना देखील मोफत प्रवास योजना सुरू आहे. त्यामुळे महिला भाविक व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढणार  आहे.

सोहळा तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मंदिर समितीकडून दर्शन रांग उभारण्यात आलेली आहे. या रांगेत पत्राशेड येथे कायमस्वरुपी चार व तात्पुरते दोन असे सहा दर्शन शेड उभारण्यात आलेले आहे. वॉटरप्रूफ दर्शन रांग असल्यामुळे ऊन, वारा व पाऊस या पासून भाविकांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. दर्शन रांगेतील दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी खिचडी, लिंबू सरबत, ताक किंवा मठ्ठा मोफत वाटप करण्यात येणार आहे. भाविकांसाठी पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या वतीने कायम स्वरुपी व तात्पुरते असे मिळून सुमारे ११०० कर्मचाऱ्यांव्दारे स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. रोज ८० ते ९० टन कचरा उचलण्यात येत आहे. आरोग्य विभागाने देखील भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तयारी केली आहे. नगरपालिका आरोग्य विभाग, पंचायत समिती आरोग्य विभाग व उपजिल्हा रुग्णालय सज्ज झाले आहेत.

तसेच आपत्कालीन मदत केंद्राच्या माध्यमातून भाविकांना सेवासुविधा पुरवण्यात येणार आहेत. सव्वाशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, तर अपघातमुक्त वारी साजरी करण्याचे नियोजन जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी केले आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील तीन पोलीस उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, ४३ सपोनि. बंदोबस्तासाठी असणार आहेत. बाहेरील जिल्ह्यातून ५४४ पोलीस अंमलदार, ६०० होमगार्ड, राज्य राखील दलाची तुकडी असा एकूण १५०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असणार आहे. शहरातील वाहतूक मार्गातही बदल करण्यात आलेला आहे. नदीपात्रात जीवरक्षक बोटी तैनात करण्यात येणार आहेत.

.हेही वाचा 

पंढरपूर : विठ्ठल मंदिरात आजपासून तुळशी पूजा; उद्यापासून चंदनउटी पूजा 

सोलापूर : माघवारीसाठी वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ; टाळ, मृदुंगाच्या गजराने रस्ते दुमदुमले

पंढरपूर : आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना करता येणार सेवा

Back to top button