सोलापूर : माघवारीसाठी वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ; टाळ, मृदुंगाच्या गजराने रस्ते दुमदुमले | पुढारी

सोलापूर : माघवारीसाठी वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ; टाळ, मृदुंगाच्या गजराने रस्ते दुमदुमले

उत्तर सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : ज्ञानोबा, तुकोबा, माऊलीच्या गजरात, टाळ मृदुंगांच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात सोलापूर जिल्ह्यासह, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिंड्या माघवारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. बुधवारी (दि.१) माघ एकादशी असल्याने वारकरी मोठ्या उत्साहात दिंडीत चालत जाताना दिसत आहेत.

वारकऱ्यांच्या हातात पताका, गळ्यात टाळ, हातात विना, तर महिला वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ, मृदुंगाच्या गजरात दिंडी तल्लीन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. चालली…चालली…पंढरपुरा, ज्ञानोबा तुकाराम, हरी मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, देवाचिये व्दारी उभा क्षणभरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, या अभंगात वारकरी देहभान हरपून गेला आहे. हरिपाठ, गवळणी, किर्तन, विठूनामाच्या जयघोषाने पंढरपूर मार्ग दुमदुमला आहे.

दिंडीतील वारकऱ्यांना नागरिक, सेवाभावी संस्थांच्या वतीने चहा, नाश्ता, महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. दिंडीमार्गावर डॉक्टर, आशा वर्कर, परिचारिका यांच्याकडून मोफत गोळ्या, औषधांचे वाटप करण्यात येत आहे. अनेक गावातील लहान व वयोवृद्ध वारकरी आपल्या कुटुंबासमवेत बैलगाडीतून पंढरपूरला जाताना दिसत आहेत. वारकऱ्यांना पांडुरंग भेटीची आस लागून राहिली आहे. दोन वर्ष कोरोनामुळे आषाढी, कार्तिकी, माघवारी पायी दिंडी सोहळा झाला नव्हता. यावर्षी माघ वारी पायी दिंडीमध्ये बाल वारकऱ्यांपासून वयोवृद्ध वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button