सोलापूर: ५० हजार महिलांनी घेतला एसटीच्या 50 टक्के सवलतीचा लाभ | पुढारी

सोलापूर: ५० हजार महिलांनी घेतला एसटीच्या 50 टक्के सवलतीचा लाभ

सोलापूर : अंबादास पोळ : राज्याच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीटदरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवार (दि.17) पासून तिकीटदरात 50 टक्के सवलत देण्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाली आहे. सोलापूर विभागातून अवघ्या 50 तासांत 50 हजार 767 महिलांनी सवलतीचा लाभ घेतला आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात देखील चांगली भर पडल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करताच या योजनेला सोलापूर विभागातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

एसटी महामंडळाच्या स्तरावर या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला दिली जाणार आहे. या योजनेमुळे महिलांना कामानिमित्त, नातेवाइकांकडे, पर्यटनासाठी, देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे महिला वर्गातून कौतुक केले जात आहे.

एका तासात एक हजार महिलांचा प्रवास…

सोलापूर विभागातील नऊ आगारामधून 650 बसमधून पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला असून एकाच दिवसांत नऊ हजार नऊशे पंचानऊ महिला प्रवाशांनी प्रवास केला. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.18) 40 हजार 772 महिलांनी प्रवास केल्याची नोंद विभागीय कार्यालयाने घेतली. यातून 14 लाख 17 हजार 069 रुपये उत्पन्न मिळाले असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी नियंत्रक अजय पाटील यांनी सांगितले.

शासनाने महिलांना 50 टक्के तिकिटामध्ये सवलत दिल्याने प्रवाशी संख्येमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.
– बलभीम पारखे, विभागीय सचिव, सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना

मागील दोन दिवसात महिला वर्गांतून  उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आहे. महिला सन्मान योजनेमुळे एसटीच्या उत्त्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल.
– विनोदकुमार साहेबराव भालेराव, विभाग नियंत्रक, सोलापूर विभाग

हेही वाचा 

Back to top button