सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचा आरोप, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी | पुढारी

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचा आरोप, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूवर भ्रष्टाचाराचा आरोप करत भाजप आमदार रामभाऊ सातपुते यांनी विधानसभेत सीबीआयमार्फत चौकशीची मागणी केली. यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांची उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार असल्याचे सांगितले. फडणवीस यांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप विधानसभेत आमदार सातपुते यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी खोटा बायोडाटा सादर केला आहे. मागील पाच वर्षात एकही नवीन अभ्यासक्रम सुरू झाला नाही. विद्यापीठाचा शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झालेली नाही. विद्यापीठास चांगले मानांकन मिळालेले नाही. संशोधनाच्या विषयांमध्ये कुलगुरूंकडून पुढाकार घेण्यात आला नाही. कुलगुरूंनी परीक्षेमध्ये उत्तर पत्रिका तपासण्यासाठी वार्षिक आठ कोटीचा घोटाळा केला. पाच वर्षात 40 कोटीचा घोटाळा झाला आहे. कुलगुरूंनी घेतलेल्या निर्णयाविरोधात भूमिका मांडणाऱ्या संस्थाचालकांच्या विरोधात संस्थेची मान्यता रद्द करण्यात आली.

राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला. विद्यापीठ कॅम्पसमधील कॅन्टीन बांधकामात आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे. आयत्या वेळेच्या विषयासाठी बारा सात कलमाचा मागील पाच वर्षात दीडशे वेळा वापर करण्यात आला. सिनेट निवडणुकीमध्ये प्राध्यापकांना मतदान करण्यासाठी धमक्या देण्यात आले असल्याचे आरोप आमदार सातपुते यांनी केला आहे. यावर विधानसभेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करू, असे सांगितले.

हेही वाचा 

Back to top button