सोलापूर : वीरशैव लिंगायत धर्मगुरूंनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट | पुढारी

सोलापूर : वीरशैव लिंगायत धर्मगुरूंनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबरोबरच वीरशैव लिंगायत समाजासाठी अनेक योजनांची घोषणा केली. या घोषणेचे स्वागत करत महाराष्ट्र, कर्नाटक, मराठवाडा, आंध्रप्रदेश येथील धर्मगुरूंनी विधान भवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी विविध विषयावर चर्चासुद्धा केली.

अर्थसंकल्पामध्ये सरकारने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली. या महामंडळामुळे सोलापूर जिल्ह्यातील १५ लाखांहून अधिक समाज बांधवांना उद्योग, व्यवसायासाठी फायदा होणार आहे. यावेळी धर्मगुरूंनी आरक्षणाच्या बाबतही फडणवीसांशी चर्चा केल्याचे समजते. समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करणार असून विकासाचे अनुशेष भरून काढण्यासाठी शासन मागे पडणार नाही, अशी हमी फडणवीस यांनी दिल्याचे नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.

यावेळी श्रीषब्र १०८ शांतवीर शिवाचार्य महास्वामी (औसा), श्रीषब्र १०८ महादेव शिवाचार्य महास्वामी (वाई), श्रीषब्र १०८ श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी (नागणसूर), श्रीषब्र १०८ नीलकंठ शिवाचार्य महास्वामी (मैंदर्गी) आणि श्रीषब्र १०८ सुगरेश्वर शिवाचार्य महास्वामी (कर्नाटक) यांच्यासह आंध्रप्रदेश, मराठवाड्यातील महास्वामींनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला. यावेळी आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते.

संस्कृतीच्या पायावर देशाचा डोलारा

भारतीय संस्कृती अतिप्राचीन आहे. ही संस्कृती अंधश्रद्धेला मानत नाही. मात्र धर्माला प्रोत्साहन देते. भारतीय संस्कृतीचा वारसा आपल्या देशाबरोबरच परदेशातही जपला जात असल्याने अभिमान वाटत आहे. याच संस्कृतीच्या पायावर देशातील माणुसकी आणि देशाचा डोलारा उभा असल्याचे मत मैंदर्गी मठाचे मठाधिपती नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : 

Back to top button