सोलापुरातील सामूहिक दुष्कर्माचा तपास पोलीस अधीक्षकांनी करावा : मुंबई उच्च न्यायालय | पुढारी

सोलापुरातील सामूहिक दुष्कर्माचा तपास पोलीस अधीक्षकांनी करावा : मुंबई उच्च न्यायालय

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका सामूहिक दुष्कर्म प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी करुन त्याचा अहवाल 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. गडकरी व पी.डी.नाईक यांच्‍या खंडपीठाने दिला आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, सामूहिक दुष्कर्म केल्याप्रकरणी  गणेश कैलास नरळे (वय 29), विष्णू गुलाब बरगंडे (वय 40, दोघे रा. आवसे वस्ती, आमराई) या आरोपींवर  फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. परंतु तपास अधिकार्‍याने आरोपी बरगंडे याच्याविरुध्द पुरावा मिळाला नसल्याचे नमूद केले. तर आरोपी नरळे याच्याविरुध्द किरकोळ फसवणुकीच्या गुन्ह्याअतंर्गत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पीडितीने तपास अधिकार्‍याच्या तपासावर व्यथित होवून उच्च न्यायालयात या प्रकरणात तपास अधिकारी बदलून अन्य अधिकार्‍याकडे तपास हस्तांतर करावा व प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास करावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

पीडितेने दाखल केलेल्‍या याचिकेवर न्यायमूर्ती गडकरी व नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. या वेळी खंडपीठाने तपास अधिकारी विष्णू गायकवाड यांच्यावर  ताशेरे ओढले.  या प्रकरणाचा तपास वरिष्ठ आय.पी.एस. अधिकार्‍याकडे हस्तांतरित करण्याचा आदेश पोलीस महासंचालकांना दिला. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी उच्च न्यायालयात म्हणणे सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने या सामूहिक दुष्कर्म प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी करुन 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात अहवाल सादर करण्याचा आदेश दिले.

हेही वाचा :

Back to top button