

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून भूदरगड पोलिसांनी आणखी एक एजंटला अटक केली आहे. अमोल सुरेंद्र सुर्वे (वय 42, रा. रुई ता. हातकणंगले) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आज रविवारी (दि. 22) पहाटे ४ च्या सुमारास सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. (Kolhapur) बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी प्रकरणी सर्जेराव अशोक पाटील (वय- ३२ रा. शिरसे, ता. राधानगरी) याला गुरुवारी (दि.२१) अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत याप्रकरणी मुख्य सुत्रधार विजय कोळस्करसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करत असल्या प्रकरणी मडिलगे खुर्द येथील विजय कोळस्कर यास मंगळवारी रंगेेहात पकडले. कोळस्कर याच्याकडे गर्भलिंग निदान चाचणीसाठी पाठविणाऱ्या डाॅ. बाबुराव दत्तू पाटील (रा. बामणे) व सागर शिवाजी बचाटे (रा. सोनाळी, ता. कागल), राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील दिगंबर मारुती किल्लेदार व नर्स शीला शामराव माने या चौघांना अटक केली. शनिवारी रात्री सर्जेराव अशोक पाटील यास अटक केली. हे पाचही पैसे घेऊन ग्राहकांना गर्भलिंग तपासणीसाठी पाठवत होते. तपासणीनंतर गर्भपात करण्याची जबाबदारी शिला माने करत होती.
बोगस डॉक्टर विजय कोळसकर हा गेली कित्येक वर्षे बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा गोरख धंदा करत होता. त्याच्याकडे गर्भलिंग निदान चाचणीसाठी पाठविणाऱ्या एजंट्सची मोठी साखळी असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा