पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : मकरसंक्रातीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व रुक्मिणी मातेला वाणवसा देण्यासाठी राज्यभरातून असंख्य महिलांनी पंढरीनगरीत हजेरी लावली. शनिवार व रविवार लागोलाग सुट्टी असल्याने लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंढरीनगरी गजबजली आहे. मकर संक्रातीनिमित्त खासकरून जास्तीत जास्त महिलांना श्रींचे मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन देण्याचे नियोजन मंदिर समितीने केले.
शनिवारी (दि.१४) भोगी साजरी करण्यासाठी मंदिर समितीने महिलांना श्री रुक्मिणी मंदिरात पहाटे ४ ते ५.३० च्या दरम्यान परवानगी दिली होती. यावेळी हजारो महिलांनी रुक्मिणी मातेच्या साक्षीने भोगी साजरी केली. त्यानंतर आज (दि.१५) मकर संक्रातीनिमित्त मंदिरात रुक्मिणी मातेला वाणवसा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या लाखो महिलांच्या उपस्थितीने पंढरीनगरी गजबजून गेली. मंदिर परिसरात विशेषत: नामदेव पायरी येथे गर्दी होऊ नये ,यासाठी येथे पोलिसांकडून वाणवसा देण्या-घेण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामूळे महिलांनी नामदेव पायरीच्या बाजुला बसत एकमेकींना तिळगूळ, वाणवसा देत मकरसंक्रात साजरी केली. या वेळी विठुरायाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तीमय झाला. पंढरपूरात राज्यभरातून भाविक आल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी दिसत होती.
मकर संक्रातीनिमित्त राज्यभरातून आलेल्या महिला भाविकांनी श्री विठ्ठल -रुक्मिणी दर्शन घेण्यासाठी व वाणवसा देण्या-घेण्यासाठी दर्शन रांगेत उभारणे पसंद केले होते. तर पदस्पर्श दर्शन केवळ महिलांना देण्यावर भर दिला असल्यामूळे दर्शन रांगेत हजारोंच्या संख्येने महिला उभारल्याने दर्शन रांग सारडा भवन ते पुढे पत्राशेडपर्यंत गेली होती. किमान 30 हजार भाविक रांगेत उभारले होते.
मकर संक्रातीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभार्यात व मंदिरात द्राक्षे, बोर, कोबी, फ्लॉवर, भोपळा, वांगी, मिरची, लिंबू, गाजर, ऊस , भेंडी, मूळा, दोडका, गवारी, मक्याचे कणीस आदीसह फळ व पालेभाज्यांची सुंदर व आकर्षक आरास करण्यात आली. लक्षवेधी आरास केल्याने दर्शनाकरिता आलेल्या भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात होते.