पिंपरी : तुकाराम महाराज मंदिरासाठी 5 कोटी देणार : फडणवीस | पुढारी

पिंपरी : तुकाराम महाराज मंदिरासाठी 5 कोटी देणार : फडणवीस

पिंपरी : भंडारा डोंगरावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिर उभारण्यासाठी मदत करण्याची आमदार जगताप यांची इच्छा होती. जिल्हा नियोजन समिती अथवा राज्य सरकारच्या माध्यमातून त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जाहीर केले. दिवंगत आमदार जगताप यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवडगाव येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ही शोकसभा झाली. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भाई जगताप, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, उमा खापरे यांच्यासह विविध पक्षांचे शहराध्यक्ष उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडमध्ये उभारणार कॅन्सर रुग्णालय

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे शहरासाठी मोठे योगदान आहे. समाजात कार्य करताना त्यांचे कार्य भावी पिढ्यांना माहिती व्हावे, यासाठी आमदार जगताप यांच्या स्मरणार्थ महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार विलास लांडे यांच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या विधी महाविद्यालयालाही दिवंगत जगताप यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येईल. आई-वडिलांनी पैसे दिले नाही, म्हणून आमदार जगताप यांनी शेतीत धने पेरून त्यातून मिळालेल्या पैशातून पहिली निवडणूक लढविली होती, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी सांगितली. आमदार जगताप हे अजातशत्रू नेते होते. शहराच्या विकासात त्यांचा मोठा वाटा असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

बारणे म्हणाले, एक कर्तृत्ववान आमदार, चांगले काम करणारा नेता शहराने गमावला आहे. भाई जगताप यांनी आमदार जगताप यांच्या व्यक्तिमत्त्वाला कर्तृत्त्वाची जोड होती, असे मत व्यक्त केले.

फडणवीस यांचे डोळे पाणावले
आमदार जगताप यांच्या आठवणी सांगताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे डोळे काही क्षणासाठी पाणावले. राज्यसभेची निवडणूक असताना पीपीई कीट घालून आणि लाइफ सेव्हिंग अ‍ॅम्ब्युलन्समधून आमदार जगताप हे मतदानासाठी आले होते. ही आठवण सांगताना फडणवीस यांना गलबलून आले.

Back to top button