पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत गैरसमज पसरवू नका : देवेंद्र फडवणीस | पुढारी

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत गैरसमज पसरवू नका : देवेंद्र फडवणीस

सोलापूर : प्रतिनिधी : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यासाठी शासन कटीबध्द आहे; परंतु जिल्ह्यातील काही मंडळी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि कॉरिडॉर विषयी गैरसमज पसरवत आहेत. जुनी मंदिर पाडून टाकणार असल्याचा कांगावा करीत आहेत. मात्र अशा लोकांनी कॉरिडॉर आणि तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविताना स्थानिकांत मतं विचारात घेवून तसेच कोणाला ही विस्थापित न करता ही कामे हाती करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती करतो की याबाबत आपण गैरसमज पसरवू नका, अशी विनंती आज ( दि. ११ ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरव समाजाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यासाठी सोलापूरात आले होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खा.जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी आदी उपस्थित होते.

या वेळी फडणवीस म्‍हणाले की, गुरव समाजाच्या मागण्या तर मान्य करण्यात येतील तसेच त्यांच्यासाठी राखीव असणार्‍या वर्ग तीनच्या जमिनीबाबत ही लवकरच मंत्रालयात बैठक घेवून त्यावर गुरव समाजाचे अधिकार कसे ठेवता येतील या बाबत विचार करु, असे अश्‍वासन यावेळी दिले. तसेच सध्या वाराणसी आणि तिरुपती बालाजी मंदीराच्या धरतीवर पंढरपूर विकास आराखडा करण्यात आलेला आहे. लवकरच पंढरपूर कॉरिडॉर निर्माण करण्यात येत आहे. यामध्ये पारंपारिक मंदिर जोपासून त्या ठिकाणी पंढरपूर शहर आणि मंदिराचा विकास करण्यात येणार आहे.

मात्र काही मंडळी विनाकारण याला विरोध करत आहेत. त्यांनी पंढपूर विकास आराखड्याचा अभ्यास करावा, यानंतर आपले मत मांडावे, असे आवाहन ही फडणवीस यांनी केले . पंढरपूरचा विकास करताना कोणाला विस्थापित करुन तसेच कोणाची रोजीरोटी हिसाकावून त्या ठिकाणी विकास करण्यात येणार नाही तर सर्वांना सोबत घेवून तो विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे विनंती करुन सांगतो की या बाबत कोणीही गैरसमज अथवा अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले .

हेही वाचा  

Back to top button