राजगुरूनगर : राजकीय संधीची कधीच चिंता केली नाही : आ. दिलीप मोहिते पाटील

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : राजकारणात आपण समाधानी असल्याने आपल्याला परिणामांची चिंता वाटत नाही. जनतेच्या आशिर्वादावर गेलेली पदे पुन्हा खेचून आणली. शिकलेला माणूस चांगल्या विचारांशी जोडला जातो आणि अशा विचारांचा प्रसार करण्यासाठी आपण तालुक्यातील शहरी व दुर्गम भागात शिक्षण कार्य सुरू केले आहे. राजगुरूनगरच्या विधी महाविद्यालयात शिक्षण घेतलेले जवळपास ३०० वकील खेड न्यायालयात कार्यरत आहेत. लोकोपयोगी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आणि होत आहेत अशा कार्याचा मला अभिमान वाटतो असे मत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयाचा १७ वा वर्धापनदिन रविवारी (दि. ११) झाला.
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारलेले कलावंत अनिल गवस यांच्या हस्ते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यावेळी करण्यात आले. मराठवाडा येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर कार्यक्रमाचे उद्घाटक तर आमदार दिलीप मोहिते पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पटेल ते मान्य करतो, न पटल्यास समोर कोणीही असो पर्वा न करता बोलतो. संघर्ष हा आपला स्वभाव आहे आणि त्यालाच जनतेने स्वीकारले आहे. म्हणून आपल्यात खोटा बदल होणार नाही. काही पदरात पडो किंवा न पडो असेही मोहिते पाटील म्हणाले. त्यांच्या बोलण्यातील रोख नेमका स्वपक्षीय वरिष्ठांकडे की विरोधकांकडे होता, याबाबतीत स्पष्टीकरण झाले नाही.
सुरेखाताई मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, अरुण चांभारे, डॉ. प्रमिला बांबळे, डॉ. शिवाजीराव मोहिते पाटील, शांताराम देशमुख, कैलासराव सांडभोर, विनायक घुमटकर आदीसह तालुक्यातील मान्यवर, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. स्वतःतील बलस्थाने ओळखून ती मोठी केल्यास आयुष्यात अपयश येणार नाही असे अनिल गवस यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. किरण शिंदे यांना आदर्श शिक्षक म्हणून यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आदेश टोपे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष बबनराव डांगले यांनी सर्वांचे आभार मानले.