नागपूर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गाचा शुभारंभ ही सर्वाधिक आनंदाची बाब असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला सुरुवातीला कसा विरोध झाला, याचा गौप्यस्फोट केला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. समृद्धी महामार्ग वेगाने पूर्ण होण्यात ज्या अधिकाऱ्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली, अशा अधिकाऱ्यांची नावे घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतूक केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आज मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, आमच्याच कारकिर्दीत या महामार्गाचे लोकार्पण होत आहे. या प्रकल्पात सुरुवातीला खूप अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला बराच विरोध झाला. लोकांना विरोध करायला लावला गेला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून बैठकाही झाल्या, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर निशाणा साधला.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रकल्पावर काम करणारे सगळे लोक सोबत येणे दुर्मिळ असते. शेतकरी सुरुवातीला साशंक होते. पण, आम्ही 'आरटीजीएस'च्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. या प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिल्या गेल्याने जमीन अधिग्रहणाचा सगळ्यात मोठा टप्पा विक्रमी वेळेत पूर्ण झाला", असेही शिंदे यांनी नमूद केले.