सोलापूर : शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बांधली जनावरे; मंद्रुप एमआयडीसीचा विषय पेटला | पुढारी

सोलापूर : शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बांधली जनावरे; मंद्रुप एमआयडीसीचा विषय पेटला

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील संभाव्य एमआयडीसीला काही स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. सातबारावरील बोजा कमी करा, या मागणीसाठी शेतकरी वर्गातून मागील काही दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येत आहे.  शेतकऱ्यांनी आज (गुरूवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात आपली जनावरे आणून बांधली. व कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार संघटनेतर्फे करण्यात आले.

‘एमआयडीसी’ आरक्षित क्षेत्र अशी नोंद सातबाऱ्यावर झाली आहे. यामुळे खरेदी-विक्री व्यवहार करीत असताना व बँकेकडून कर्ज घेताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मोबदला न देता व शेतकऱ्यांची संमती नसताना सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचे नाव लावण्यात आल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र याची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज भूसंपादनासाठी जमिनीची मोजणी सुरू असताना त्यास विरोध केला व जिल्हाधिकारी कार्यालयात जनावरे आणून बांधत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

याप्रकरणी तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शेतकऱ्यांसह प्रहार संघटनेने या वेळी दिला. जिल्हाधिकाऱी कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, जनावरे तेथून हालविण्यासाठी अतिक्रमण विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

या वेळी प्रहारचे अजित कुलकर्णी, मोहसिन तांबोळी, महेश शिंगाडे, रमेश कुमार, तायप्पा कोळी ,जमीर शेख, महादेव कुंभार, मलकारी जोडामोटे, सरस्वती कुंभार, सातव्वा कुंभार, सविता कुंभार, रमेश कुंभार, पद्मावती कुंभार, महेश कुंभार मळसिद्ध कुंभार, कस्तुरा नंदूरे, लक्ष्मीबाई मेंडगुदले यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा :

Back to top button