गोवा : ५३ व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तीन ठिकाणी पहा मोफत चित्रपट; नोंदणी नसणाऱ्यांनाही संधी

गोवा : ५३ व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तीन ठिकाणी पहा मोफत चित्रपट; नोंदणी नसणाऱ्यांनाही संधी

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यामध्ये २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत ५३ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडणार आहे. या चित्रपट महोत्सवात तीन ठिकाणी मोफत चित्रपट पाहता येणार आहेत. ज्यांनी इफ्फीसाठी प्रतिनिधी नोंदणी केलेली नाही, अशांनाही याचा लाभ घेता येणार आहे. यंदा मिरामार किनारा, मडगाव येथील रवींद्र भवन आणि अल्तिनो येथील जॉगर्स पार्क येथे ओपन एअर स्क्रिनिंग होणार आहे.

भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या महोत्सवासाठी ५ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर हिंदीसह अन्य भाषांमधील अनेक चित्रपटांचा या महोत्सवात समावेश असणार आहे. २० नोव्हेंबर पासून सुरू होणारा इफ्फी आठवडाभर सुरू असणार आहे. यादरम्यान मराठी चित्रपटांसह हिंदी, दाक्षिणात्या चित्रपटांचंही स्क्रिनिंग होणार आहे. इफ्फीमध्ये दिग्गज कलाकार हजेरी लावत असतात. यावर्षी कोणकोणते कलाकार या चित्रपट महोत्सवासाठी दाखल होणार याची उत्सुकता लागली आहे.

अनेक वर्षांनी पुन्हा यंदा महावीर उद्यान आणि कला उद्यान येथे मनोरंजन विभाग सुरू करण्यात येणार आहेत. हा विभागदेखील नोंदणी नसणाऱ्यांसाठी खुला असणार आहे. दोन्ही ठिकाणी लाईव्ह परफॉर्मन्स, आर्ट इन्स्टॉलेशन आणि अर्थातच खाद्यपदार्थांचे गाडे असणार आहेत. याशिवाय कला अकादमी ते गोवा मनोरंजन संस्थेपर्यंत नदीतीरावरील रस्त्यावर कला सजावट करण्यात येणार आहे.

यंदा विशेष गाला प्रीमिअर विभाग

यंदाच्या इफ्फीत गाला प्रीमिअर विभाग असणार आहे. यामध्ये वर्षभर चर्चेत राहिलेले चित्रपट अथवा वेब सिरीज दाखवण्यात येतील. तसेच यातील कलाकारांना प्रेक्षकांशी संवादही साधता येणार आहे.

अजय देवगण, श्रिया सरण येणार

इफ्फीमध्ये अजय देवगण आणि श्रिया सरण यांचा दृश्यम २ चा प्रीमिअर शो होणार आहे. हे दोघेही यासाठी गोव्यात येणार आहेत. अजय देवगणने गोमंतकीय विजय साळगावकरची भूमिका केली होती. चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news