सोलापूर : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट | पुढारी

सोलापूर : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : सोलापूर शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे अनेक नवीन तक्रारी समोर येत आहेत. महाविद्यालयाची जीर्ण झालेली इमारत आणि टेक्स्टाईल अभ्यासक्रम बंद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी मोफत पार्किंगची सुविधा देणे अपेक्षित असताना येथे पे अँड पार्कच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करण्यात येत आहे.

शासकीय तंत्रनिकेतनाच्या तक्रारीची आकडेवारी रोजच वाढत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून इमारतीची मोठ्याप्रमाणात झालेली दुरावस्था असो अथवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व स्वच्छतेचा प्रश्न याविषयी मात्र प्रशासन गप्प आहे. तसेच प्रशासनाकडून येथील कारभार रामभरोसे सुरू आहे. येथे मागील चार वर्षापासून कायमस्वरूपी प्राचार्यांची जागाही रिक्त आहे.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरू आहे. दहावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेत असतात. मात्र प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक समस्‍यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना होस्टेलवर अस्वच्छ जागेत गरजेपोटी राहावे लागत आहे. कंत्राटी शिक्षकांचा पगार रखडल्याने काही शिक्षक अर्ध्यातूनच अध्यापन बंद करून निघून जातात.

विद्यार्थ्यांकडून पैसे तर शिक्षकांना मोफत सुविधा

दरवर्षी विविध प्रकारच्या टेंडर काढण्यात येतात. त्यापैकी पार्किंगचे टेंडर ही काढण्यात येते. यामध्ये एक लाख रुपये ॲडव्हान्स स्वरूपात जमा करावे लागते तर वार्षिक पंधरा हजार रुपये भाडे शासनाला द्यावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून सायकलसाठी तीन रुपये तर मोटरसायकलसाठी सात रुपये प्रति दिवस आकारले जात असल्याचे समोर आले आहे. पण प्राचार्यांनी टेंडरमध्ये शिक्षकांकडून कसलीच पार्किंगसंबंधी शुल्क आकारू नये याबाबत सविस्तर परिपत्रक काढले आहे. यामुळे महाविद्यालय प्रशासनाकडून शिक्षक व विद्यार्थी यामध्ये दुजाभाव होताना स्पष्टपणे दिसून येत आहे.

आकडेवारी :

महाविद्यालयात विद्यार्थी ६००
प्रति दिवस
मोटार सायकल ७/- रुपये
१ महिन्याचे – १६८/- रुपये
शैक्षणिक वर्ष १६८० /- रुपये
सायकल ३/- रुपये
१ महिन्याचे ७२/- रुपये
शैक्षणिक वर्ष ७२० /- रुपये

आम्ही रीतसर शासनाचा टेंडर निघाल्यानंतर अर्ज भरून टेंडर चालवण्यासाठी घेतला आहे. टेंडरची ३० जून २०२३ पर्यंत मुदत आहे. विद्यार्थ्यांना मासिक पास कमी दरात आकारले जाते. पण इतर विद्यार्थी व बाहेरील येणाऱ्यासाठी ही फी आकारली जाते.
– दाते,कंत्राटदार शासकीय तंत्रनिकेतन पे अँड पार्किंग

हेही वाचा

मुलांसाठी ‘ओमेगा-3’चे अनेक लाभ 

कोल्हापूर : सामान्यांची चपाती, भाकरी महागाईने करपली!

Egypt Bus Accident : इजिप्तमध्ये कालव्यात बस कोसळून अपघात; 22 ठार, 7 जखमी

Back to top button