सोलापूर : मोहोळ ते पंढरपूर मार्गावर कार-बसचा अपघात; तीन ठार | पुढारी

सोलापूर : मोहोळ ते पंढरपूर मार्गावर कार-बसचा अपघात; तीन ठार

मोहोळ (सोलापूर), पुढारी वृत्तसेवा : मोहोळ ते पंढरपूर मार्गावर पेनूर नजीक कार आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पंढरपुरातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ऋषिकेश साखरे (वय 25), सुरज कदम (वय 28), प्रशांत शेटे (वय 40) सर्व राहणार विजापूर गल्ली, पंढरपूर अशी अपघातात मरण पावलेल्या युवकांची नावे आहेत. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात दत्ताराम नारायण जाधव (वय 65, रा. लोकमान्य नगर, ठाणे) यांनी फिर्याद दिली. यावरून खासगी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे येथील दत्ताराम जाधव हे पंढरपूर येथे मुलगी व जावई प्रशांत शेटे यांना भेटण्यासाठी आले होते. 11 नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांचा जावई प्रशांत शेटे व त्यांचे मित्र सुरज कदम व ऋषिकेश साखरे हे तिघेजण एमएच 13 डीएम 9562 या क्रमांकाच्या कारमधून सोलापूरला शोरूममध्ये आले होते.

शुक्रवारी मध्यरात्री सोलापूरहून कारमधून पंढरपूरकडे जात असताना मोहोळ-पंढरपूर रस्त्यावरील पेनूर जवळ विरूद्ध दिशेने येणार्‍या एम एच 13 एएक्स 0445 क्रमांकाच्या खासगी बसने समोरून येत धडक दिली. अपघातामध्ये कारमधील तिघेही युवक जागीच ठार झाले. अपघातात दोन्ही वाहनांचे मिळून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा  

Solapur : शासकीय पॉलिटेक्निकच्या इमारतींची दुरवस्था

Solapur : लाच प्रकरणातील सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार अखेर निलंबित

Solapur : राज्यपालांच्या सोलापूर दौऱ्याला शिवप्रेमींचा विरोध

Back to top button