सोलापूर पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांचा सोलापुरात राज्यपालांचा शुक्रवारी दौरा असल्याने सोलापुरातील शिवप्रेमींनी राज्यपाल कोश्यारी यांना सोलापुरात (Solapur) येऊ देणार नाही असा इशारा दिला होता.
आसरा चौकामध्ये सुमारे 20 हजार शिवप्रेमी आंदोलन करतील असे सांगण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आसरा चौकात शिवप्रेमींनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. चले जाव चले जाव, कोश्यारी चले जाव अशी घोषणाबाजी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचे विधान केल्याचा आरोप करत आक्रमक भूमिका आंदोलनामध्ये पहायला मिळाली. यावेळी चले जाव चले जाव, राज्यपाल चले जाव, राज्यपाल हाय हाय म्हणत त्यांच्या वक्तव्याचा निषेध शिवप्रेमींकडून करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानानंतर राज्यभरात निषेध केला जात आहे. अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असतानाच राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. आसरा चौकात झालेल्या आंदोलनाला शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा