सोलापूर : तरुणाचा खून, ऊसतोड मुकादमासह पाच जणांना अटक | पुढारी

सोलापूर : तरुणाचा खून, ऊसतोड मुकादमासह पाच जणांना अटक

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा :  बायकोबद्दल आक्षेपार्ह बोलल्याबद्दल ऊसतोड मुकादमासह पाच जणांनी मिळून चालकास जबर मारहाण करून खून केला. मृतदेह पोत्यात बांधून विल्हेवाट लावण्यासाठी झोपडीत लपवून ठेवला. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी ऊसतोड मुकादमासह पाच जणांना मंद्रुप पोलिसांनी अटक केली आहे.

रमेश केशव मिसाळ (वय ३४, रा. खोकरमोहा ता. शिरूर कासार, जि. बीड) असे खून झालेला चालकाचे नाव आहे. या प्रकरणी अभिमान बाजीराव साबळे, मनीषा अभिमान साबळे, अशोक बगीनाथ गिरी, अंजना अशोक गिरी (सर्वजण रा. मलकाची वाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) व मलप्पा मळसिद्ध कांबळे (रा. सादेपूर, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंद्रूप येथील निंबर्गी रस्त्यावरील सीतामाई तलावजवळ चार झोपड्या टाकून ऊसतोड मजूर राहत होते. भंडरकवठेच्या लोकमंगल साखर कारखान्यासाठी त्यांची ऊसतोड टोळी होती. मंगळवारी रात्री आरोपी व मयत सर्वजणांनी मिळून जेवण केले. रात्री अकरा वाजता मुकादम अभिमान साबळे व अशोक गिरी यांच्या झोपडीजवळ गप्पा मारत होते. तेव्हा दारूच्या नशेत चालक रमेश मिसाळ मुकादम अभिमान साबळे याच्‍या पत्नीबद्दल अश्लील बोलू लागला.हे ऐकून अशोक गिरी व मल्लाप्पा कांबळे यांनी अभिमान यास असला कसला तुझा मित्र. तुझ्या बायकोबद्दल अश्लील बोलत आहे. असे म्हणून वाद घातला. तेव्हा नशेत असलेल्या रमेश याने अशोक गिरी याच्या पत्‍नीबद्दल अपशब्द काढले.

गिरी याने रमेश याला मारहाण केली. त्यानंतर अभिमान साबळे यांनीही त्‍याला लाकूडाने मारहाण केली. वरील पाच जणांनी रमेश यास लाकडाने व लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. तो बेशुद्ध होऊन झोपडी समोरच निपचित पडला. सकाळी उठून पाहिले तर त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यास ओढत झोपडीत आणले. एका पोत्यात त्यांचा मृतदेह बांधून पलंगाच्या मागे झाकून ठेवला हाेता.

या प्रकरणाची माहिती फिर्यादी बाळू पवार यांनी मंद्रुप पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी भेट देऊन पाहणी केली. मंद्रुप पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तपास पीएसआय अमितकुमार करपे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button