सोलापूर : रेल्वेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादी ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाला अटक

सुशीलकुमार शिंदे. ( संग्रहित छायाचित्र )
सुशीलकुमार शिंदे. ( संग्रहित छायाचित्र )

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. ही घटना गुरूवारी सकाळी सहा वाजता दादर रेल्वे स्टेशनला येण्यापूर्वी घडली. मंदार प्रमोद गुरव (वय २३, रा.मु.पो. घाटणे, ता.माढा. जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना मुंबई येथे कामानिमित्त जायचे होते. त्यांचे रिझर्वेशन गाडी नं १२११६ सिद्धेश्वर एक्सप्रेस बोगीच्या एचए १ कंपार्टमेंटमधील कुपी नं. ए मध्ये केले होते. त्यावेळी विलास कृष्णकांत गांवकर व संजय तुकाराम राजेशिर्के यांना पोलीस हवालदारांची पीएसओ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. दादर रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी शिंदे हे बाथरूमला गेले होते. ते बाथरूममधून बाहेर आले असता, मंदार गुरव हा शिंदे यांचा सीटवर ठेवलेला मोबाईल फोन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. शिंदे यांनी त्याला पकडून ठेवले. त्यानंतर हवालदार गांवकर आणि राजेशिर्के यांना कुपीमध्ये बोलावून घेऊन मंदार याला त्यांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी हवालदार गांवकर यांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करणारा मंदार हा सोलापुरातील माढा तालुक्यातील घाटणे गावचा असून, त्याचे वडील ग्रामपंचायत सदस्य आहेत. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याचा मुलगा आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news