सर्दी-खोकल्याच्या औषधांत वापरल्या जाणार्‍या कोडिनवर बंदी? | पुढारी

सर्दी-खोकल्याच्या औषधांत वापरल्या जाणार्‍या कोडिनवर बंदी?

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : जागतिक आरोग्य संघटनेने पश्चिम आफ्रिकेतील गॅम्बियामध्ये दगावलेल्या 66 बालकांच्या मृत्यूवर संशयाची सुई ठेवलेल्या भारतातील औषध कंपनीने बनविलेल्या खोकल्यावरील तीन औषधांतील घटक सध्या औषध महानियंत्रकांच्या स्कॅनरखाली आहेत. औषधे तांत्रिक सल्लागार मंडळाने खोकल्याच्या औषधांमध्ये वापरण्यात येणार्‍या कोडिन फॉस्फेट या औषधावर बंदी घालण्यासाठी शिफारस केली आहे.

मंडळाच्या शिफारशीमुळे भारतीय औषध उद्योगांत खळबळ उडाली आहे. समितीच्या या शिफारशीवर केंद्रीय औषधे महानियंत्रकांची मोहोर उठणे बाकी आहे. अशी मोहोर उठली, तर बाजारातून खोकल्यावर गुणकारी; पण नशेला आमंत्रण देणार्‍या या औषधाचे मार्ग बंद होऊ शकतात.

कोडिन फॉस्फेट हे औषध सर्दी-खोकल्यावर गुणकारी म्हणून ओळखले जाते. सर्दी-खोकल्याच्या औषधात त्याचा वापर होतो. या औषधाची योग्य प्रमाणात मात्रा घेतल्याने आजार जलदगतीने बरा होण्यास मदत होते; पण हे औषध अधिक मात्रेत घेतले, तर त्याची नशा चढते. यामुळेच अशा औषधांचा नशेसाठी वापर होतो. भारतीय नशिले पदार्थविरोधी कृती गटाने यापूर्वी टाकलेल्या अनेक छाप्यांमध्ये या औषधांच्या लाखो बाटल्या जप्त केल्या आणि या व्यवसायात विशेषतः औषधांच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या माफियांच्या टोळ्या जेरबंदही करण्यात आल्या. तेव्हापासूनच अशा औषधांचा नशेसाठी होणारा वापर लक्षात घेऊन कोडिन फॉस्फेटवर बंदी आणण्याची मागणी केली जात होती. सप्टेंबरच्या उत्तरार्धात ड्रग टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी बोर्डाची एक बैठक झाली. या बैठकीत कोडिन फॉस्फेटच्या बंदीची शिफारस केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या बंदीमुळे सर्दी-खोकल्याच्या बाजारातील एकूण औषधांपैकी कोडिनचा वापर करण्यात येणार्‍या 8 टक्के औषधांवर त्याचा परिणाम होईल. शिवाय, सुमारे 43 कोटी रुपयांची उलाढाल रोखली जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतील गॅम्बियामध्ये भारतीय कंपनीने बनविलेल्या चार औषधांवर जागतिक आरोग्य संघटनेने आक्षेप घेतला होता. या औषधांमधील एथिलिन ग्लायकॉल व डाय एथिलिन ग्लायकॉल हे दोन घटक सध्या औषधे महानियंत्रकांच्या स्कॅनरखाली आहेत. त्यापाठोपाठ आता कोडिन या औषधावरही बंदीची कुर्‍हाड येत असल्याने देशातील औषधनिर्मिती उद्योग अस्वस्थ आहे. या औषध उद्योगाच्या शिखर संघटनेने नुकतेच केंद्राकडे एक निवेदन सादर केले आहे.

कोडिन हा अफूचा उपपदार्थ म्हणून ओळखला जातो. उपयोगाबरोबर मोठ्या उपद्रव मूल्यासाठी कारणीभूत ठरणारे हे औषध सध्या देशात नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागल्याने भारत सरकार त्यावर बंदीचा विचार करत आहे. सध्या त्याला भारतीय औषध उद्योगातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असला, तरी औषधे महानियंत्रक काय अंतिम निर्णय घेतात, याकडे सध्या उद्योगाचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button